शुभांगी वाघमारे
महाराष्ट्र पोलीस न्यूज
(पुणे दि. ६) : येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालय येथे २४X७ सुरू असणारी ऑनलाईन टेलीमानस १४४१६ ही टोलमुक्त सेवा सुरु करण्यात आली असून गरजुंनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
टेलीमानस सेवेअंतर्गत चिंता, तणाव, नैराश्य, नातेसंबंधातील दुरावा, कामाचा ताणतणाव, चिडचिडपणा, एकटेपणा, वर्तवणूकीतील बदल, निद्रानाश, अतिविचार, उदासिनपणा, व्यसनाधिनता आदी प्रकारच्या मानसिक समस्या समजून घेत त्यावर मार्गदर्शन करण्यात येत आहे.
टेलीमानस च्या १४४१६ या क्रमांकावर संपर्क केल्यानंतर मानसिक आरोग्य सुविधा प्रदान करण्यासह केवळ समुपदेशन न करता मानसिक आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला व पाठपुरावा सेवा आणि वैयक्तिक सेवांशी जोडून दिले जाते. या सेवेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांनी या क्रमांकावर संपर्क केल्यानंतर संबंधितांनी निवडलेल्या भाषेत मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयाचे अधीक्षक यांनी दिली आहे.
(२० मिनिटांचा एक कॉल)
हेल्पलाईनवर एका कॉलसाठी २० मिनिटांचा कालावधी ठरवून दिला असून त्यानंतर तो कॉल कट होतो. त्यामुळे पुन्हा कॉल करता येतो किंवा हेल्पलाईनवरही येतो. यामध्ये संबंधित कॉल धारकाचे सर्व म्हणणे ऐकून त्याचे समुपदेशन केले जाते.
(शहरी भागातील कॉलचे प्रमाण ६० टक्के)
आतापर्यंत आलेल्या कॉल्सपैकी ४० टक्के कॉल ग्रामीण, तर ६० टक्के शहरी भागातील असल्याचे समोर आले आहे.
(५ टक्के प्रमाण न बोलणाऱ्यांचे)
काही जण हेल्पलाईनवर कॉल करण्याची हिंमत करतात, मात्र हेल्पलाईन सेंटरवरून हॅलो म्हटल्यावर काहीही न बोलता काही क्षणात तो कॉल कट करतात. असे दिवसभरात दोन ते तीन कॉल असून त्याचे प्रमाण साधारणपणे ५ टक्के असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
(१ टक्का प्रमाण इतर आजारांच्या चौकशीचे)
या हेल्पलाईनवर आजारांबाबत वयोवृद्धांच्या नातेवाईकांकडून चौकशी केली जाते. यामध्ये विसरभोळे पणावर काय उपचार आहेत किंवा इतर एखाद्या आजाराबाबत चौकशी केली जाते. असे प्रमाण अवघा १ टक्का आहे.
(तरुणाई जास्त त्रस्त)
कोरोनामुळे तसेच कौटुंबिक वाद, झोप येत नाही, विविध चिंताग्रस्त असे प्रमाण वाढले आहे. यामध्ये तरुण सापडले असून त्यांचे प्रमाण ६० ते ७० टक्के इतके आहे. यामध्ये महिलांपेक्षा पुरुषांचे प्रमाण अधिक आहे. या हेल्पलाईनचा ठाणे-मुंबईपेक्षा पुणेकर मंडळी जास्त वापर करीत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
👉🏻👉🏻(काय आहे टेली मानस ?)👈🏻👈🏻
मानसिक आजारांवर मात करण्यासाठी केंद्र शासनाने टेली मानस हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमात टोल फ्री क्रमांक देण्यात आला असून त्यावर संपर्क साधल्यास शंकांचे निरसन होते.
(साधा १४४१६ वर संपर्क)
कुटुंबातील किंवा तुम्ही मानसिक आजाराने त्रस्त असाल, ताणतणावात असाल, तर त्यातून मुक्ती मिळवण्यासाठी १४४१६ या क्रमांकावर संपर्क साधल्यास सल्ला मिळेल.
(या मानसिक समस्यांवर समुपदेशन)
झोप येत नाही, डोक्यामध्ये वेगवेगळे विचार येतात, घाबरल्यासारखे वाटते, त्यातूनच अंगाला घाम येतो, भास होतो, कशातच मन लागत नाही, अशा मानसिक आजारांनी त्रस्त व्यक्तींनी संपर्क साधल्यास मार्गदर्शन मिळते.
हा केंद्राचा उपक्रम असून तो ३ वर्षांसाठी प्रायोगिक तत्त्वावर राबवला जात आहे. राज्यात ठाणे, पुणे, बीड, नागपूर अशा ठिकाणी टेली मानस हेल्पलाईन सुरू केली जाणार आहे. ठाण्यात हेल्पलाईन सुरू झाली आहे. सुरुवातील ऑडिओद्वारे सल्ला दिला जाणार असून कालांतराने तो व्हिडीओद्वारे देण्याची सुविधा उपलब्ध होईल. उपचाराची गरज असल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांना जिल्हा रुग्णालयात जाऊन उपचार घेण्याबाबत सूचना केल्या जात आहेत. या हेल्पलाईनवर संपर्क करणाऱ्या व्यक्तीची माहिती कुठेही उघड केली जात नाही. त्यामुळे मानसिक ताणतणावाने त्रस्त असणाऱ्यांनी टेली मानस १४४१६ या हेल्पलाईनवर संपर्क साधावा.


إرسال تعليق