सुनिल थोरात (संपादक)
महाराष्ट्र पोलीस न्युज
नाशिक (न्यूज) : शहर पोलिस आयुक्तालय हद्दीतून एमडी (मेफेड्रॉन) ड्रग्जसह अमलीपदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आयुक्त संदीप कर्णिक कठोर झाले असून, ‘टीप’ द्या, संशयितांविरुद्ध धडक कारवाई करण्याचे आवाहनच सोशल मीडियावरून आयुक्तांनी केले आहे. दरम्यान, आयुक्तांच्या व्हॉटसॲप क्रमांकावर आलेल्या माहितीवरून पोलिसांनी गेल्या आठवड्यात एमडी ड्रग्ज पेडलरला जेरबंद केले आहे.
पाठीमागील सहा महिन्यांपासून नाशिक एमडी ड्रग्ज प्रकरण राज्यातच नव्हे तर देशभरात गाजते आहे. कोट्यवधी रुपयांच्या ड्रग्जसह कारखाने उद्ध्वस्त केले आहेत. तर, नाशिक गुन्हे शाखेने सोलापुरात जाऊन एमडी ड्रग्जचे दोन कारखाने उद्ध्वस्त करीत टोळी जेरबंद केली आहे.
नाशिक शहरात लपूनछपून एमडी ड्रग्जची विक्री सुरू आहे. आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिककरांना तक्रारी करण्यासाठी व्हॉटसॲप क्रमांक ९९२३३२३३११ सुरू केला आहे. यावर आत्तापर्यंत १३८० तक्रारी आलेल्या आहेत. यामध्ये दोन तक्रारी या एमडी ड्रग्जसंदर्भात होत्या.
त्यावरून शहर गुन्हे शाखेने अंबडच्या चुंचाळे परिसरात आणि आडगाव शिवारात कारवाई करीत ड्रग्ज पेडलरच्या मुसक्या आवळल्या होत्या. पोलिस आयुक्तांनी व्हॉटसॲप क्रमांकावर अमली पदार्थांसंदर्भात शहरात चोरीछुपे सुरू असलेल्या कारवायांची माहिती पोलिसांनी कळवावी, अन्यथा पोलिस आयुक्तांच्या व्हॉटसॲप क्रमांकावर द्यावी, असे आवाहन केले आहे. अवैध धंद्यां विषयीचीही माहिती दिल्यास धडक कारवाई केली जाईल, असेही म्हटले आहे.
"शहरात कुठेही अमली पदार्थांची विक्री होत असेल तर त्याची माहिती संबंधितांनी पोलिसांच्या व्हॉटसॲप क्रमांक ९९२३३२३३११ यावर कळवावी. पोलिसांकडून तत्काळ कारवाई केली जाईल." - संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त, नाशिक

إرسال تعليق