प्रतिनिधी : अतुल सोनकांबळे
बारामतीमध्ये संत तुकाराम महाराज राष्ट्रीय महामार्गावर भरधाव गाडीचा टायर फुटून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात इंदापूरमधील काँग्रेसच्या नेत्याच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार,बारामती तालुक्यातील रुई इथं ही घटना घडली आहे. या अपघातात इंदापूर तालुक्यातील सणसरच्या युवकाचा जागीच मृत्यू झाला. आदित्य आबासाहेब निंबाळकर असं या तरुणाचं नाव असून तो इंदापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आबासाहेब निंबाळकर यांचा मुलगा आहे.आज संध्याकाळी चारच्या सुमारास बारामती तालुक्यातील रुई गावच्या पाटी नजीक हा अपघात घडला. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेल्या माहितीनुसार, आदित्य हा काटेवाडी कडून रुई मार्गे बारामतीत येत होता. त्याच्या चार चाकी गाडीचं टायर फुटल्याने गाडी पलटी झाली. कार वेगात असल्यामुळे ती एका इमारतीच्या कडेला जाऊन आदळली. यात तो गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याला तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. आदित्य निंबाळकर यांच्यावर संध्याकाळी ८:३० वाजेच्या सुमारास इरिगेशन बंगला इथं घरा शेजारी अंत्यसंस्कार होणार आहे.
إرسال تعليق