*कॉलेज मधील प्रेम संबंधाच्या कारणावरून दोन मुलांवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला*
*जीवघेणा हल्ला करणारे आरोपींना वालचंदनगर पोलिसांनी केले दोन तासात जेरबंद*
शिवाजी आप्पा पवार इंदापूर तालुका प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील भवानीनगर गावात भवानीमाता मंदिराच्या परिसरात धक्कादायक घडली. कॉलेज मधील प्रेमसंबंधाच्या घटना मधील कारणावरुन दोन मुलांवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला. संचित घोळवे आणि सुजल जाधव अशी जखमींची नावे आहेत. यापैकी सुजल जाधव याच्या डोक्यामध्ये जबर वार केल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. घटनेच्या केवळ दोन तासातच वालचंदनगर पोलिसांनी या घटनेतील आरोपींना अटक केली अदनान महंमद शेख, पियुष प्रथम चव्हाण आणि यशराज गणेश अरवडे यांना ताब्यात घेण्यात आले असून हे तिघेही इंदापूर तालुक्यातील सणसर या गावातील आहेत. यांच्यासोबत या गुन्ह्यात इतर दोन विधी संघर्ष ग्रस्त बालकांचाही समावेश आहे. वालचंदनगर पोलिसांनी या आरोपींची भवानी नगर मधील ज्या बाजारपेठेत हा हल्ला केला त्याच बाजारपेठेतून त्यांची धिंड देखील काढली आहे. हल्ला करणारी मुले ही बारामती वरुन पुणेच्या दिशेने जात असल्याची तांत्रिक माहिती प्राप्त होताच पोलिसांनी त्यांचा सिने स्टाईलने पाठलाग करुन त्यांना सुपा पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस स्टाफ व स्थानिक गावकरी यांच्या मदतीने
ताब्यात घेतल आहे.
अधिक माहिती अशी की, भवानीनगर येथील संचित बाळासो घोळवे, सुजल संतोष जाधव व त्यांचे इतर मित्र हे भवानीनगर येथील भवानी माता मंदीर मध्ये बसलेले असताना अदनान शेख, पियुष चव्हाण, यश अरवडे व इतर दोन विधी संघर्ष ग्रस्त बालकांनी यांनी सुजल जाधव व संचित घोळवे यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करत अदनान शेख व अन्य एकाने त्यांच्याकडील लोखंडी कोयत्याने संचित घोळवे, सुजल जाधव यांच्यावर कोयत्याने वार केले. मारहाण करणाऱ्या विधी संघर्ष ग्रस्त बालकाच्या नात्यातील मुलीसोबत संचित घोळवे याचे प्रेम संबंध होते
याच कारणावरुन संचित घोळवे याचा दिनांक ३० जानेवारी २०२५ रोजी वाद झाला होता. परंतु तो वाद दोघांनी आपआपसात मिटवुन घेतला होता. त्यानंतर शुक्रवार दिनांक ३१ जानेवारी रोजी संचित बाळासो घोळवे, सुजल संतोष जाधव व त्यांचे इतर मित्र भवानीनगर येथील मंदीरा मध्ये बसलेले असताना तु माझ्या मामाच्या मुलीसोबत प्रेम संबंध ठेवतो काय आता तुला सोडत नाही. असे म्हणत त्यांना मारहाण करण्यास सुरवात केली. अदनान शेख व अन्य एकाने त्याच्याकडील लोखंडी कोयत्याने संचित घोळवे व सुजल जाधव यांच्यावर वार केले. त्यामध्ये सुजल जाधव याच्या डोक्यामध्ये जबर वार बसल्याने तो गंभीर जखमी झाला.
सदरची कामगिरी ही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुर्दशन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे, पोलीस उप-निरीक्षक विजय टेळकीकर, पोलीस हवालदार गुलाबराव पाटील, पोलीस हवालदार बापु मोहिते, पोलीस हवालदार शैलेश स्वामी, पोलीस हवालदार गणेश काटकर, पोलीस हवालदार अजित थोरात, पोलीस हवालदार नानासाहेब आटोळे, पोलीस हवालदार सचिन गायकवाड, पोलीस अंमलदार अभिजीत कळसकर, पोलीस अंमलदार विक्रमसिंह जाधव यांनी केली आहे.
إرسال تعليق