शिवाजी महाराजांचा आदर्श युवकांनी घ्यावा - हर्षवर्धन पाटील
-बावडा येथे शिवजयंती निमित्त शोभायात्रा
-हर्षवर्धन पाटलांचा शोभायात्रेत सहभाग
इंदापूर प्रतिनिधी शिवाजी आप्पा पवार
राजमाता जिजाऊं पासून प्रेरणा व संस्कार घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी स्वराज्याची स्थापना केली. जीवनात संकटे आली तरी त्यावर संयमाने कशी मात करावी, हे शिवचरित्रातून शिकावे. युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन जीवनामध्ये यशस्वीपणे वाटचाल करावी, असे आवाहन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे.
बावडा येथे शिवाजी एज्युकेशन संस्थेच्या प्रांगणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास 395 व्या शिवजयंतीनिमित्त हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी (दि.19) पुष्पहार अर्पण करून पूजा व आरती केली. सदर प्रसंगी हर्षवर्धन पाटील बोलत होते.
ते पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन आपणा सर्वांना कायम वाटचाल करावयाची आहे. छत्रपतींचा आदर्श हा समाजातील प्रत्येकासाठी यशस्वी जीवन जगण्यासाठी उत्तम आहे. शिवाजी महाराजांच्या मातीत आपण जन्मलो आहोत. शिवाजी महाराजांचे जीवन चरित्र समाजाला कायमच प्रेरणा व स्फूर्ती देत राहील, असे गौरवोद्गार हर्षवर्धन पाटील यांनी काढले. यावेळी भाषणात हर्षवर्धन पाटील यांनी शिवजयंती कार्यक्रम व शोभायात्रेचे भव्य नियोजन केलेबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष मनोज पाटील, उदयसिंह पाटील, सचिव किरण पाटील व संचालन मंडळाचे कौतुक केले.
या कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांनी लेझीम पथक, झांज पथक तसेच लाठी-काठी या मर्दानी खेळाची आकर्षक प्रात्यक्षिके सादर केली. याप्रसंगी श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी, शिवप्रतिष्ठान बावडा व छत्रपती शिवाजी तरुण मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी सैनिक, ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर सुमारे 4 हजार विद्यार्थ्यांचा सहभाग असलेली भव्य शोभायात्रा गावातून काढण्यात आली. या शोभायात्रेमध्ये हर्षवर्धन पाटील हे सहभागी झाले.
या शोभायात्रेमध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा पुतळा रथ, छत्रपती शिवाजी महाराज व अष्टप्रधानमंडळाच्या वेशातील विद्यार्थी, मावळ्यांच्या वेशातील घोडस्वार विद्यार्थी, सेनापती तानाजी मालुसरे व वीर बाजीप्रभु यांच्या वेशभूषेतील विद्यार्थी, छत्रपती शिवाजी महाराज पालखी यांचा सहभाग होता. तसेच लेझीम पथक, झांज पथक, तुतारी, लाठी-काठी पथक व मावळ्यांच्या वेशातील विद्यार्थी यामुळे बावडा गावातील वातावरण शिवमय झाले होते. शोभयात्रा बावडा बाजारतळ येथे आलेनंतर शिवप्रतिष्ठान बावडा व शिवाजी तरुण मंडळ यांच्या वतीने आयोजित शिव प्रतिमा पूजन कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांनी झांज पथक, लेझीम व मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी हर्षवर्धन पाटील, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
•चौकट:-
बावडा गावची शिवजयंती आदर्श -हर्षवर्धन पाटील
--------------------------------------------
छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ असा भव्य दिव्य पुतळा झाला आहे. आता प्रत्येक वर्षी आजच्याप्रमाणे अश्वारूढ पुतळ्यापासून प्रत्येक वर्षी भव्य शोभायात्रा निघेल. पुढील वर्षी या शोभायात्रेत महिलांचाही सहभाग राहील. बावडा गावची शिवजयंती तालुक्यामध्ये नव्हे तर राज्यभर आदर्श अशीच असेल, असे प्रतिपादन यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी केले.
_____________________________
إرسال تعليق