शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

गोस्वामी तुलसीदास व मुंशी प्रेमचंद जयंती उत्साहात साजरी : भाऊसाहेब नेने महाविद्यालयात साहित्यिक वातावरणाने भरलेला दिवस


       संजय गायकवाड 

                    रायगड जिल्हा उपसंपादक 

पेण ( रा. जि.उपसंपादक ) – पेण एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब नेने कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात गुरुवार, दिनांक ३१ जुलै २०२५ रोजी हिंदी साहित्यातील दोन महान विभूतींच्या – भक्तिकालीन कवि गोस्वामी तुलसीदास आणि सामाजिक वास्तववादाचे समर्थ लेखक मुंशी प्रेमचंद – यांच्या १४५व्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम हिंदी विभाग, हिंदी अनुवाद प्रमाणपत्र कोर्स आणि डी.एल.एल.ई युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने उत्साहात साजरा करण्यात आला.


या कार्यक्रमात मुंशी प्रेमचंद यांच्या साहित्यसंपन्न जीवनावर आधारित भाषण व कथा वाचन स्पर्धा भरवण्यात आल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सदानंद धारप सर काही कारणास्तव कार्यक्रमात उपस्थित राहू शकले नाहीत, मात्र त्यांनी आपले शुभेच्छा संदेश पाठवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. यानंतर प्रास्ताविक करताना हिंदी विभागप्रमुख कवी डॉ. देवीदास बामणे ‘संघर्ष’ यांनी गोस्वामी तुलसीदास व मुंशी प्रेमचंद यांच्या जीवनकार्याचा आणि साहित्याच्या प्रभावाचा सविस्तर परिचय करून दिला. त्यांनी प्रेमचंद यांच्या साहित्यावर आधारित दोन सुंदर स्वरचित कविता सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली.


कार्यक्रमाच्या पुढील भागात प्रा. अस्मिता पाटील यांनी प्रेमचंद यांच्या जीवनाचा अभ्यासपूर्ण परिचय करून दिला, तर डॉ. साळुंखे सर यांनी विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या उत्साहाचे कौतुक केले. कथा वाचन स्पर्धेच्या परीक्षक प्रा. सौ. महानंदा कोळी मॅडम यांनी प्रेमचंद यांच्या साहित्याची समाज परिवर्तनामधील भूमिका अधोरेखित करत वाचन संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित केले. “प्रत्येक साहित्यिक आपली जीवनदृष्टी साहित्याद्वारे मांडतो; म्हणून वाचकांनी तर्कवितर्क न करता साहित्याचा निखळ आनंद घ्यावा,” असे विचार त्यांनी मांडले.


कथा वाचन स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. स्पर्धेतील विजेत्यांमध्ये कु. वैष्णवी भास्कर गुळवे (एस.वाय.बी.कॉम) हिने प्रथम क्रमांक पटकावला, तर कु. दर्शन धाकल्या उघडे (१२ वी, पेण प्रायव्हेट हायस्कूल) हिला द्वितीय क्रमांक मिळाला. तृतीय क्रमांकासाठी कु. पंकज अशोक शिंदे (एस. वाय. बी. ए.) आणि कु. निशा विठ्ठल राठोड (एस. वाय. बी. ए.) यांना विभागून पुरस्कार देण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते सर्व विजेत्यांना प्रमाणपत्रे आणि बक्षिसे प्रदान करण्यात आली.


या विशेष कार्यक्रमासाठी ॲड. मंगेश नेने सर यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे कुशल सूत्रसंचालन प्रा. अस्मिता पाटील यांनी केले, तर शेवटी प्रा. सुषमा खोत यांनी आभार प्रदर्शन करत कार्यक्रमाची सांगता केली.


हिंदी साहित्यातील दोन महान विभूतींच्या स्मृती जागवणारा हा कार्यक्रम केवळ साहित्यप्रेमींसाठी नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या संवेदनशीलतेच्या विकासासाठीही प्रेरणादायी ठरला.

Post a Comment

أحدث أقدم