फिरोज सय्यद | प्रतिनिधी - किनवट, जिल्हा नांदेड
माहूर तालुक्यातील सिंदखेड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) रमेश जाधवर यांनी उत्कृष्ट पोलिस प्रशासकीय कामगिरी करत ७८% वॉरंट निर्गमित केलेल्या कार्यात प्रावीण्य मिळवल्याबद्दल त्यांचा नुकताच जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात त्यांना प्रशस्तीपत्र देत गौरवण्यात आले.
सिंदखेड पोलीस ठाण्याचा कार्यक्षेत्रात गुन्हेगारी नियंत्रणासह न्यायप्रक्रियेतील महत्त्वाच्या टप्प्यांपैकी एक असलेल्या वॉरंट निर्गमित कामात रमेश जाधवर यांनी अत्यंत जबाबदारीने आणि तत्परतेने भूमिका बजावत ७८% वॉरंट निर्गमित केले. ही कामगिरी पोलिस दलाच्या दैनंदिन कार्यक्षमतेचा एक उत्कृष्ट नमुना मानली जात आहे.
माहूर शहर पोलीस ठाण्यानंतर तालुक्यातील दुसरे प्रमुख पोलीस ठाणे असलेल्या सिंदखेड येथे सपोनि जाधवर यांनी चालू वर्षातील जून महिन्यात ही उल्लेखनीय यशस्वी मोहीम राबवली. त्यांच्या या कार्यक्षमतेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाने त्यांचा गौरव करण्याचा निर्णय घेतला.
सन्मानप्रसंगी पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी त्यांच्या कार्यशैलीचे विशेष कौतुक करत, अशा कार्यक्षम आणि निष्ठावान अधिकाऱ्यांमुळेच पोलिस दलाची प्रतिमा अधिक दृढ होत असल्याचे सांगितले. यावेळी अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
सपोनि रमेश जाधवर यांना मिळालेला हा विशेष सन्मान ही त्यांच्या अखंड सेवाभावाची आणि कर्तव्यनिष्ठेची पोचपावती मानली जात आहे. या यशाबद्दल सिंदखेड आणि माहूर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
या सन्मानामुळे इतर पोलिस अधिकाऱ्यांनाही प्रेरणा मिळेल आणि प्रशासन कार्यक्षमता वाढेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात येत आहे.
إرسال تعليق