शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

त्र्यंबकेश्वरात पत्रकारांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध!....

        

     नेताजी खराडे 
            दौंड तालुका प्रतिनिधी

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) येथे इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या वार्तांकनादरम्यान २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी एक धक्कादायक प्रकार घडला. साम टीव्हीचे ब्युरो चीफ अभिजित सोनवणे, पुदारी न्यूजचे ब्युरो चीफ किरण ताजने तसेच इतर पत्रकारांवर गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी भ्याड हल्ला चढवला.

मिळालेल्या माहितीनुसार, स्वामी समर्थ केंद्राजवळील पार्किंगवर काम करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांनी पत्रकारांवर लाथाबुक्क्यांचा व दगडफेकीचा प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात काही पत्रकार गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पत्रकार हे समाजासाठी, सत्यासाठी आणि लोकशाही बळकटीसाठी अहोरात्र काम करत असतात. त्यांच्यावर होत असलेले वारंवार हल्ले ही लोकशाहीसाठी काळिमा फासणारी आणि चौथ्या स्तंभावर घाला घालणारी चिंताजनक बाब आहे. यामुळे पत्रकार संघटनांसह समाजमनात संतापाची लाट पसरली आहे.
दौंड तालुका प्रिंट व डिजिटल मीडिया असोसिएशनने याबाबत यवत पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांकडे निवेदन सादर करून तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या निवेदनात संबंधित गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर तातडीने व कठोर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात कुणीही पत्रकारांवर हात उचलण्याचे धाडस करणार नाही, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.

पत्रकारांवर झालेला हा हल्ला हा केवळ व्यक्तीवरचा नाही, तर लोकशाहीवरचा हल्ला आहे. अशा प्रकारचे गुन्हेगार प्रवृत्तीचे कृत्य कोणीही सहन केले जाणार नाही, असा इशारा पत्रकार संघटनांनी दिला आहे.

 पत्रकारांवरील हल्ल्याचा निषेध करा, गुंड प्रवृत्तीवर कठोर कारवाई करा – अशी सर्वत्र मागणी जोर धरत आहे.

Post a Comment

أحدث أقدم