मुख्य संपादिका
पुणे : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या नावावर असलेल्या कारने रिक्षाला दिलेल्या भीषण धडकेत रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे, तर दोन प्रवासीही जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी (दि. ३०) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास मुंबई–बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव बुद्रुक परिसरात, हॉटेल विश्वाससमोर घडला. गंभीर जखमी झालेल्या रिक्षाचालकाचे नाव सामाजी विठ्ठल मरगळे (वय ४४, रा. सिंहगड रस्ता) असे आहे. पहाटेच्या सुमारास रिक्षा जात असताना गौतमी पाटीलच्या नावावर असलेल्या किया कंपनीच्या कारने मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की रिक्षाचे मोठे नुकसान झाले. मरगळे गंभीर जखमी झाले असून रिक्षामध्ये असलेले दोन प्रवासी जखमी झाले आहेत. अपघात झाल्यानंतर स्थानिक नागरिक तातडीने घटनास्थळी धावले.
त्यांनी रिक्षाचालकासह जखमींना बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी मरगळे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. प्रवाशांनाही आवश्यक उपचार मिळत आहेत. दरम्यान, अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून कारसह फरार झाला होता. मात्र पोलिसांनी अल्पावधीतच कारचा शोध लावला आणि चालकाला ताब्यात घेतले.
कार कोण चालवत होते, त्यावेळी नृत्यांगना गौतमी पाटील स्वतः वाहनात होती का, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून अपघाताचा तपास सुरू केला आहे. कारचा वेग किती होता, निष्काळजीपणामुळे की इतर कारणामुळे हा अपघात झाला, याची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. गौतमी पाटीलच्या नावावर असलेल्या कारमुळे या घटनेची विशेष चर्चा रंगली असून, पोलिस तपासाचा पुढील अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे.
إرسال تعليق