प्रतिनिधी (सुनिल थोरात)
महाराष्ट्र पोलीस न्यूज
पुणे (हवेली) : उरुळी कांचन ८ ऑगस्ट २०१७ च्या नंतर जन्मलेल्या मुलींच्या इयत्ता पहिली ते बारावीपर्यतचा गरज पडल्यास उच्च शिक्षणाचा खर्च ग्रामपंचायत उरुळी कांचन करणार असल्याची घोषणा सरपंच राजेंद्र बबन कांचन यांनी केली आहे.
आज ते “माझा गाव माझा विकास" (जीपीडीपी) या विषयावरील विशेष ग्रामसभेत बोलत होते. 'गाव करी ते राव काय करी..' अशी म्हण आहे. उरुळी कांचन गावाने सावित्रीच्या लेकींची शिक्षणाची वाट सुकर करत ही म्हण खरी करण्याचा निश्चय केला आहे.
ग्रामसभेत एकमताने हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. यावेळी ८ ऑगस्ट २०१७ नंतर जन्मलेल्या एका किंवा दोन मुलींच्या जन्मानंतर नसबंदी शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या जोडप्याला शासनाकडून प्रत्येकी २५ हजार व ग्रामपंचायत कडून ११ हजार रुपयांची (एफडी) मुलींच्या नावावर करण्यात येणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव वा आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने ग्रामीण भागातील अनेक मुलींना उच्च शिक्षणासाठी गावात, शहरात जाता येत नाही. त्यामुळे इच्छा असूनही अनेकींचे शिक्षण अर्ध्यावरच सुटते. यासाठी उरुळी कांचन ग्रामपंचायतीने एक नाविन्यपूर्ण पाऊल उचलले आहे.
यावेळी उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत विधवा महिलांना अन्य महिलांप्रमाणे सौभाग्यालंकारासह समान वागणूक देण्याची मागणी पंचायत समितीच्या माजी उपसभापती हेमलता बडेकर यांनी मागणी केली होती. विधवा प्रथेचे निर्मूलन करताना त्यांना मुख्य प्रवाहात आणणे, पतीच्या निधनानंतर त्यांचे सौभाग्यालंकार न उतरवणे, सद्यःस्थितीत विधवांचे समाजातील स्थान व त्यांना मिळणारी वागणूक व विधवा प्रथेबाबत समाजाची मानसिकता बदलणे, विधवांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणणे, समाजातील विविध उपक्रमात सहभागी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
उरुळी ग्रामपंचायत यापुढे नियमितपणे यासाठी निधीची तरतूद करणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी यशवंत डोळस यांनी स्पष्ट केले. उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत येणारा निधी हा एकाच प्रभागात खर्च न करता सहाही प्रभागात समान प्रमाणात वापरण्यात यावा विकास कामे व्हावीत या संदर्भात चर्चा करण्यात आली. अंगणवाडी पर्यवेक्षिका सिद मॅडम यांनी एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पानुसार २०२३-२४ च्या जीपीडीपी आराखड्यात १० टक्के तरतूद करण्याबाबत सविस्तर चर्चा केली.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य हेमलता बडेकर, माजी सरपंच संतोष कांचन, उपसरपंच अनिता तुपे, ग्रामपंचायत सदस्य अमितबाबा कांचन, भाऊसाहेब कांचन, मिलिंद जगताप, शंकर बडेकर, भाऊसाहेब तुपे, अंगणवाडी पर्यवेक्षिका सिद मॅडम, ज्येष्ठ पत्रकार सुनील जगताप, ग्रामविकास अधिकारी यशवंत डोळस. अंगणवाडी सेविका आदी मान्यवर उपस्थित होते.


إرسال تعليق