सुनिल थोरात (संपादक)
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे (हडपसर) : तरुणाने लग्नानंतरही तरुणीकडे रिलेशनमध्ये राहण्याची मागणी केली. मात्र, तरुणीने त्याला नकार दिल्याने चिडलेल्या प्रियकराने तरुणीच्या डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे.
. पुणे- सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील बोरकरवस्ती परिसरात सोमवारी (ता. १५) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
इम्रान हमीद शेख (रा. कोंढवा) असे मारहाण करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी हडपसर येथील २४ वर्षीय तरुणीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार शेख याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ही हडपसर परिसरात राहते. शेख व तरुणी यांच्यात मागील दहा महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, आरोपी इम्रानचे १५ दिवसांपूर्वी लग्न झाल्याने फिर्यादी तरुणीने त्याच्यासोबत असलेले रिलेशन संपवले होते. तसेच त्याच्यासोबत संपर्क देखील ठेवला नाही. इम्रान गेल्या दोन ते तीन दिवसांपासून तरुणीला तिच्या मोबाईलवर मेसेज करत होता. मात्र, तरुणीने त्याकडे दुर्लक्ष केले.
इम्रान याने सोमवारी (ता. १५) फिर्यादी तरुणीची भेट घेऊन जबरदस्तीने दुचाकीवर बसवले. माझ्यासोबत बोल, परत रिलेशन ठेव, अशी मागणी केली. मात्र, तरुणीने याला नकार दिला.
यामुळे चिडलेल्या इम्रान याने दुचाकी रस्त्याच्या कडेला थांबवून तरुणीच्या कानशीलात लगावली. तसेच तुला मारून टाकतो अशी धमकी देऊन लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तरुणी खाली पडली असता इम्रान याने शेजारीच पडलेला दगड उचलून तरुणीच्या डोक्यात मारला. तरुणीला गंभीर जखमी करुन आरोपी इम्रान पळून गेला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हनुमंत तरटे करत आहेत.

إرسال تعليق