नेर : लोणखेडी फाट्यावर ‘गावठी’ गतिरोधकाने २१ दिवसांत पुन्हा एक बळी; संतप्त नागरिकांचा उद्रेक
महाराष्ट्र पोलीस न्यूज 24
धुळे तालुका प्रतिनिधी संकेत बागरेचा
नेर, ता. २६ एप्रिल – लोणखेडी फाट्यावर नागपूर-सुरत महामार्गावर अनधिकृत व धोकादायक“गावठी”गतिरोधकामुळे आज पुन्हा एका दुर्दैवी तरुणाचा मृत्यू झाला. गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणी अपघातांची मालिका सुरूच असून, आजच्या घटनेने नागरिकांमध्ये प्रचंड संताप उसळला आहे.
२१ दिवसांत दुसरा बळी!
आज दुपारी साडेचारच्या सुमारास दुचाकीवर प्रवास करणाऱ्या दोन तरुणांचा या अनधिकृत गतिरोधकावरून गाडी घसरून गंभीर अपघात झाला. त्यातील एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्याला स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करून रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याची प्रकृतीही चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे.
वारंवार तक्रारी असूनही प्रशासनाचे डोळेझाक!
सन २०२० पासून गावठी गतिरोधक हटवण्याच्या मागण्या वारंवार करण्यात आल्या. परंतु प्रशासनाने केवळ आश्वासने देत परिस्थिती जसंच्या तसं ठेवली आहे. पांढऱ्या पट्ट्यांचा अभाव आणि दिशादर्शक फलक नसल्याने गतिरोधक लक्षात येत नाहीत, यामुळे अपघात घडत आहेत, असा आरोप नागरिकांनी केला आहे.
अनधिकृत गतिरोधक मृत्यूचा फास!
राष्ट्रीय महामार्ग नियमावलीनुसार कोणतेही गतिरोधक ठरावीक मापदंडांनुसार असले पाहिजेत. मात्र, लोणखेडी फाट्यावरील गतिरोधक पूर्णतः अनधिकृत असून, ते अपघातांना निमंत्रण देत आहेत.
शकिती बळी गेल्यावर प्रशासन जागे होणार?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
तत्काळ कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!
आजच्या दुर्घटनेनंतर संतप्त नागरिकांनी महामार्गावर ठिय्या देत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. प्रशासनाने तातडीने योग्य ती उपाययोजना करावी, अन्यथा जोरदार जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा श्री.रविंद्र माळी,नेर व स्थानिक नागरिकांनी दिला.
إرسال تعليق