रणजित दुपारगोडे
महाराष्ट्र प्रतिनिधी
सोलापूर :
महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी पद्धतीवर सेवेत कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाला राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना (रासकम) सोलापूर जिल्हा शाखेने जाहीर पाठिंबा दिला आहे.
दि. 14 मार्च 2024 रोजी महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच मेह, औरंगाबाद खंडपीठानेही अशा कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठी कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु या आदेशांची अद्याप अंमलबजावणी न झाल्याने राज्यभरातील कंत्राटी अधिकारी-कर्मचारी दि. 19 ऑगस्ट 2025 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत संपावर बसले आहेत.
सोलापुरातील पूनम गेट येथे सुरु असलेल्या या संपाला रासकम संघटनेचे जिल्हा सरचिटणीस राजाभाऊ सोनकांबळे यांच्या हस्ते, कार्याध्यक्ष सी. एस. स्वामी आणि उपाध्यक्ष सटवाजी होटकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकृत लेखी निवेदन देऊन जाहीर पाठिंबा देण्यात आला.
या वेळी रासकम संघटनेचे जिल्हा शाखा कोषाध्यक्ष हुसेन बाशा मुजावर, संपर्क प्रमुख शशिकांत भालेराव, मशाक मुजावर यांची उपस्थिती होती. तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी-कर्मचारी एकत्रिकरण समितीचे जिल्हा समन्वयक डॉ. रोहन वायचळ, त्यांचे पदाधिकारी, महिला व पुरुष प्रतिनिधी, डॉक्टर, नर्सेस यांच्यासह मोठ्या संख्येने अधिकारी-कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळेपर्यंत हा बेमुदत संप सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
إرسال تعليق