गणेश कांबळे
प्रतिनिधी – पुणे
पुणे : पुण्यातील सोपानबाग परिसरात मोबाईल चोरट्याने केलेल्या धाडसी चोरीचा अखेर पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. तब्बल ५,०८,५०० रुपयांचे किंमती मोबाईल फोन्स चोरणाऱ्या आरोपीला अटक करून मोठ्या कौशल्याने पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
दिनांक २६ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री साडेअकरा वाजता सोपानबाग येथील दुकानासमोर उभ्या केलेल्या टेम्पोतून एका मोबाईल चोरट्याने शटर उचकटून मोठ्या प्रमाणात मोबाईल चोरी केली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक स्थापन करण्यात आले.
तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासले. आरोपी पुण्यातून मोबाईल चोरून ठाणे येथे विक्रीस नेत असल्याची खात्री पटताच पोलिसांनी ठाणे पोलिसांच्या मदतीने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून तब्बल ५,०८,५०० रुपयांचे मोबाईल फोन हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.
या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश महाडिक, गुन्हे शाखा पथकाचे अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश होता. दरम्यान, आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास वानवडी पोलिस करत आहेत.
या यशस्वी कारवाईबद्दल पुणे पोलिसांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत असून मोबाईल चोरीच्या वाढत्या घटनांना आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
إرسال تعليق