शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

केडगाव येथे बिबट्याचा हल्ला : वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांचा संताप

                नेताजी खराडे

                       दौंड तालुका प्रतिनिधी 

दौंड तालुका --

              केडगाव येथे रविवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास घडलेल्या घटनेने परिसरात भीतीचे सावट पसरले आहे. वर्षा डोरमारे व प्रमोद म्हेत्रे यांच्या शेतात पाळीव कुत्र्यावर बिबट्याने भीषण हल्ला केला.  हल्ल्यात कुत्रा ठार झाला असून बिबट्याने त्याचे शरीर फाडून खाल्ले.


घटनेनंतर शेतकऱ्यांनी तात्काळ वनविभागाशी संपर्क साधला. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी पावसाचे कारण सांगून घटनास्थळी न जाण्याचा निर्णय घेतला. केवळ पंचनामा करण्यास टाळाटाळ करत शेतकऱ्यांना पाळीव कुत्र्याचे दफन करण्यास सांगण्यात आले. त्यामुळे शासकीय स्तरावर कोणतीही पाहणी न होता जबाबदारी झटकण्याचे काम झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.


शेतकरी प्रमोद म्हेत्रे यांनी संताप व्यक्त करताना म्हटले की, "आज आमच्या पाळीव प्राण्यावर हल्ला झाला आहे, पण उद्या घरातील माणसांवर बिबट्याने हल्ला केल्यास वनविभाग त्याचीही अशीच बेफिकिरी करणार का?" असा सवाल उपस्थित केला आहे.

ग्रामस्थांच्या मते, परिसरात बिबट्याचा वावर वाढत असून शेतकऱ्यांचे व जनावरांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. तरीही वनविभागाने गांभीर्याने लक्ष न देता केवळ जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केल्याने संतापाची लाट उसळली आहे.


स्थानिकांनी वनविभागाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन योग्य ती कारवाई करावी, तसेच ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

Post a Comment

أحدث أقدم