भाऊ वैजल
महाराष्ट्र पोलीस न्यूज
पालघर (मोखाडा) : बोगस कामे करा व लाखो रुपये कमवा." असा उदात्त हेतू उराशी बाळगुन एक ते दीड किलोमीटर रस्त्याच्या साईड पट्टी वर थातुरमातुर काम करुन चक्क एक कोटी रुपये सांबा विभागाने खर्च केला असल्याचा प्रकार समोर आला आहे
मोखाडा सां बा. विभाग हे जणू भ्रष्टाचाराचे कुरणच बनले आहे हे मागील काही वर्षांच्या भ्रष्टचाराच्या प्रकरणावरून अधोरिखित झाले आहे. यामुळे बोगस कामे करून अधिकारी व ठेकेदार जनतेच्या टाळूवरील लोणी खाऊन गब्बर झाल्याचे पहायला मिळतायत असा आरोप देखील जनतेतून केला जातो आहे.
मोखाडा खोडाळा राज्य महामार्गावर भेंडीचापाडा गावापासून पुढे जवळपास एक ते दीड किलोमीटर अंतराच्या रस्त्याची साईड पट्टी तसेच डोल्हारा ते देवबांधच्या उतारा पर्यंत तयार करण्यात आली आहे. मुळात रस्त्याची साईड पट्टी बनवताना एक ते दीड फूट खोदकाम व एक मिटर रुंद असणे अपेक्षित आहे. परंतु हे सर्व नियम धाब्यावर बसवून केवळ अर्धा फुट तर कुठे त्याही पेक्षा कमी खोदकाम केले असल्याचा आरोप केला जात असून तसेच त्यावर हातफोड खड्डी व मातीची मलमपट्टी करून रोड रोलर ने दाबली आहे. आणि त्यानंतर काळे तेल मिक्स डांबराचा फवारा देऊन साईड पट्टी तयार करण्यात आली आहे. ठेकेदाराचा हा कामसू प्रकार म्हणजे जणू आकाशाला गवसणी घालणे होय कारण मुळात मोखाडा तालुक्यात पाऊसाचे प्रमाण अधिक आहे. यामुळे धो-धो बरसणाऱ्या पावसात या साईट पट्टीच्या कामाचा लवलेशही रहातो कि नाही अशी भीती नागरिकांमधून व्यक्त केली जात असून या बोगस साईटपट्टीच्या नावाखाली केला जाणारा करोडोचा खर्च म्हणजे ठेकेदार व अधिकारी यांचेच खिसे भरण्याचा प्रकार असून यामुळे यामधील झारीतले शुक्राचार्य कोण ? याचा शोध घेऊन कारवाईची व केलेल्या कामाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
याबाबत अधिक माहितीसाठी उपअभियंता अहिराव यांना संपर्क साधला असता त्यांनी बोलण्यास टाळले.


Post a Comment