सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे : त्याच वय १६ वर्ष, सोशल मीडिया वापरायला बंदी केली म्हणून त्याने आत्महत्या केली, वय वर्ष १४ पबजी खेळण्यासाठी मोबाईल दिला नाही म्हणून आईला मारलं, ऑनलाईन रमीमध्ये पैसे गमावले म्हणून तरुणाने जीवन संपवले, युट्युबच्या वाढत्या वापरामुळे पहाटे ३ पर्यंत मुलं जागी राहातात, अवघी ३-४ वर्षाची मुलं कार्टून लावून दिलं नाही तर जेवत नाहीत ही प्रातिनिधिक उदाहरणे असली तरी आज ही पालकांसाठी चिंतेची बाबा ठरू लागली आहे.
लॉकडाऊन काळात झालेलं ऑनलाईन शिक्षण त्यामुळे अगदी लहान वयात हातात आलेला मोबाईल यामुळे आज घराघरात अशी उदाहरण सर्रास आढळतात. या सर्व पार्श्वभूमीवर लोकायत नागरी समितीच्या वतीने वडारवाडीत १२ जुलै रोजी सोशल मीडियाच व्यसन व त्याचे मुलांवरील परिणाम यावर पालकांसाठी कार्यशाळा घेण्यात आली.
या कार्यशाळेत पालकांनी विशेषतः महिलांनी घरात राहणाऱ्यांची आपापसातील कमी झालेला संवाद, मुलांची लवकर होणारी चिडचीड, अभ्यासात नसणारी एकाग्रता, प्रामुख्याने वडिलांचं घरात नसलेलं लक्ष अशा अनेक तक्रारीचा पाढाच वाचला. मोबाईलमधील ॲपची डिझाईनिंग अशा पद्धतीने केली जाते की त्याच्या जाळ्यात आपण अडकत जावं. फेसबुकमधील लाईक बटन दाबतो किंवा आपल्याला खूप सारे लाईक्स येतात. तेव्हा आपल्या मेंदूतील डोपामाईन नावाचे रसायन आपल्या मेंदूवर पसरते आणि त्यामुळे आपल्याला चांगले वाटते.
आपल्याला असं सतत चांगलं वाटत रहावं आणि आपण त्याच्या आहारी जावं म्हणून हे ॲप अशाप्रकारे डिझाईन केले जातात असं मत कार्यशाळेच्या समन्वयिका कल्याणी दुर्गा रवींद्र यांनी मांडले.
या सर्वांवर पर्याय म्हणून कुटुंबातील सर्वांनी एकत्र जेवायला बसणे, मुलां-मुलींमध्ये सोशल मीडियाचे परिणाम यावर चर्चा घेणे. मैदानी खेळ खेळणे, फिरायला जाणे, छंद जोपासणे अशा विविध पर्यायांवर चर्चा झाल्या. तसेच या मोबाईलच्या दुष्परिणामाबद्दल जनजागृती करण्यासाठी वीर लहुजी मित्र मंडळाचे आणि लोकायत नागरी समितीचे कार्यकर्ते मिळून आठवड्यातून एकदा घरोघरी जाऊन पालकांशी आणि मुलांशी संवाद साधणार आहेत.
या कार्यशाळेला वीर लहुजी मित्र मंडळाचे अध्यक्ष हुलगेश गुंजाळ व पदाधिकारी मलिक कुमठे, नागेश डोंगरे व शंकर डोंगरे यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment