शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

शेतकरी होणं शाप आहे का...? जगाचा पोशिंदा आज हवालदिल झालाय.. : अनिलकुमार गिते


 सुनिल थोरात

महाराष्ट्र पोलीस न्युज 


पुणे : निसर्गाचं दुष्टचक्र...? देशात कोण कुठं आहे..? कोणाच्या कोणासोबत बैठका सुरू आहेत...? राज्यात कोणी कोणाला पळवले...? कोण चतुर खेळी खेळले...? कोणाच्या भाषणाला वाहवा मिळाली....? आज कोणता अभिनेता कुठे दिसला...? या प्रश्नांवर राजकीय नेते, जनता जनार्दन, कार्यकर्ते, मिडिया एवढी बीजी झाली आहे की आपल्या ताटात आज जे अन्न येतय ते उद्या येईल की नाही याची खात्री नाही. 

            कोणाच्या मागे ED लागली तर कोण जनसेवा करायला वेगळं बस्तान घेऊन बाजुला पडलाय.... सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अशा दळभद्री चर्चा जवळपास सर्वच स्तरातून चवीने चर्चिल्या तर व मीडीयात दाखविल्या जातात.

           राजकारण झाले असेल तर तुमचे खोके बोके बास करा. जरा नैतिकता असेल तर थोडं बाहेर बळीराजाकडे डोकावून पण पहा.....

          ज्यांच्या कष्टाच्या आणि घामाच्या जीवावर आपण लहानपणापासून वाढलो, ज्यांच्या मुळे आपल्या ताटात दोन वेळेसच जेवण येतय तो आपला शेतकरी राजा डोक्याला हात लावून आभाळकडं पाहतोय त्या शेतकरी राजाला (माडी) इमारत नाही बांधायची, कोट्यावधींच्या संपत्तीची पण हाव नाही. तो जगतोय तर फक्त या टीचभर पोटाची आग शांत करण्यासाठी आणि आपल्या लेकरा बाळांना सुखाचे दोन घास घालण्यासाठी....

            मी ज्या मराठवाड्यातुन येतो तो पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. आमच्या लोकांची जवळपास सगळीच शेती, स्वप्नं या पावसावर अवलंबून असतात त्या निसर्गाने जर आम्हाला साथ दिली तर आमच्या बळीराजाला कोणाच्याच मदतीची गरज नसते पण यंदा मान्सून लांबला.  मोलामहागाची बियाणं मातीत टाकुन तो आभाळाकडं आस लावुन बसला आणि आता ऐनवेळी पावसाने त्याची सत्वपरीक्षा पाहीलीय....सगळ्या मराठवाड्यावर आज दुबार पेरणीचं संकट उभा राहीलय....काही ठिकाणी तर अजून पावसाची प्रतीक्षा चालूय... कोरड्या मातीकडं पाहुन आमच्या लोकांची स्वप्नं डोळ्या देखत चुरडत चाललीत....आज कोण आलं... उद्या कोण येईल याने कधी आमच्या परीस्थितीत फरक पडला पण नाही. आणि पडणार पण नाही.



             ....पण एक माणुस म्हणून आणि शेतकरी कुटुंबात जन्म घेतलाय म्हणून शेतकर्‍यांच्या वेदना नक्कीच समजु शकतो.....

            सरकार साहेब, तुमचा सत्ता पटाचा खेळ उरकला असेल तर जरा लक्ष इकडंही घाला....कारण जगाचा पोशिंदा आज हवालदिल झालाय..

          जून संपला आहे जुलै अर्धा झालाय देवा बाकी कोणाकडून अपेक्षा नाही रे तू तरी पाव आत्ता खरच गरज आहे. बळीराजाला वाचवण्याची...... एक शेतकरी पुत्र अनिलकुमार गिते

Post a Comment

Previous Post Next Post