सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे : भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत २०६ पिंपरी (अ.जा.) विधानसभा मतदार संघाच्या कार्यक्षेत्रातील ५४५ गृहनिर्माण संस्थेमध्ये २२ व २३ जुलै रोजी 'गृहनिर्माण संस्था मतदार नोंदणी अभियान' राबविण्यात येणार आहे.
मतदार यादीत नावे नाहीत अशा पात्र मतदारांना संबंधित संस्थेच्या अध्यक्षांनी कागदपत्रासंह मतदार नोंदणी अभियानात उपस्थित राहण्यासाठी प्रोत्साहित करावे. मृत व स्थलांतरीत मतदारांची माहिती देखील निवडणूक अधिकाऱ्यांना द्यावी.
मतदार नोंदणीसाठी अर्जासोबत रहिवास पुरावा म्हणून विद्युत देयक, पाणी पट्टी, आधार कार्ड, बँकेचे पासबुक, भारतीय पारपत्र, नोंदणीकृत विक्रीखत, नोंदणीकृत भाडेकरार यापैकी एका तर वयाचा पुरावा म्हणून जन्म प्रमाणपत्र, आधारकार्ड, राज्य शिक्षण मंडळाने दिलेले दहावी, बारावीचे प्रमाणपत्रे यापैकी एका पुराव्याची आवश्यकता आहे.
ऑनलाईन नाव नोंदणीसाठी https://voters.eci.gov.in या वोटर्स सर्व्हिस पोर्टल व ‘वोटर हेल्पलाईन’ ॲप या माध्यमांचा वापर करावा. नवीन नाव नोंदणीसाठी नमुना ६, नाव वगळण्याकरिता नमुना ७ व मतदार यादीतील नोंद संदर्भातील दुरुस्तीकरिता नमुना ८ भरण्यात यावे, असे आवाहन २०६ पिंपरी (अ.जा.) विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी विनोद जळक यांनी केले आहे.

Post a Comment