चांगदेव काळेल (प्रतिनिधी)
महाराष्ट्र पोलीस न्यूज
सातारा : साताऱ्याच्या शाहूपुरी परिसरात भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढले असून त्यांच्या उपद्रवामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. महिला, मुले, वृद्ध नागरिक व दुचाकीचालकांना दहशतीखाली ठेवणाऱ्या या भटक्या कुत्र्यांचा नगरपालिकेने बंदोबस्त करावा, अशी मागणी शाहूपुरी परिसरातील रहिवाशामधून होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पूर्वी ग्रामपंचायत क्षेत्रात असलेल्या व नव्याने सातारा नगरपालिका क्षेत्रात समाविष्ट झालेल्या शाहूपुरी परिसरात मोठ्या प्रमाणावर निवासी वसाहती आहेत. प्रदूषणविरहित आणि शांत, निसर्गरम्य परिसर म्हणून शाहूपुरी परिसर प्रसिद्ध असल्याने तसेच रस्ते, आरोग्य, पाणी, वीज, आदी विविध नागरी सुविधा असल्याने आणि शाळा, महाविद्यालये, मंदिरे, बाजारपेठ, हॉस्पिटल्स जवळ असल्याने या परिसरात राहण्यास अनेक जण प्राधान्य देत असतात. मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने येथे मोठ्या प्रमाणावर भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढू लागला आहे. दोन कॉलनीच्या लगत असलेल्या मोकळ्या जागेत तसेच अनेक इमारतींच्या पार्किंगच्या तसेच रस्त्यालगतच्या झाडांच्या आश्रयाने ही कुत्री वास्तव्यास आहेत.
तसेच वास्तव्यास असलेली भटकी कुत्री अन्न पाणी मिळवण्यासाठी परिसरात भटकत असतात. नगरपालिका प्रशासना कडून निबिर्जीकरण केले जात नसल्याने भटक्या कुत्र्यांच्या संख्येत वाढच होत आहे. बऱ्याचदा दुचाकीवरून ये- जा करणाऱ्या नागरिकांसह बाजारपेठेतून भाजी व अन्य खाद्यपदार्थ घेऊन जाणाऱ्या नागरिकांच्या हातातील पिशव्या हिसकावून पळण्याकडे या भटक्या कुत्र्यांचा जोर असतो. तसेच दुचाकीवरून जाणाऱ्यांना पाठलाग करण्यातही या भटक्या कुत्र्यांना मोठा आनंद वाटत असतो. त्यामुळे या कुत्र्यांची मोठी दहशत शाहूपुरी परिसरात पसरली आहे.
यामुळे या कुत्र्यांची पादचारी व वाहन चालकांना मोठी भीती वाटताना दिसत आहे. वृद्ध व्यक्ती विद्यार्थी महिला आदी अनेकांना विनाकारण चावा घेतल्याची अनेक उदाहरणे शाहूपुरी परिसरात असून संबंधित कुत्र्यांचा नगरपालिकेने बंदोबस्त करावा तसेच त्यांचे निबिर्जीकरण करण्यात यावे, अशी मागणी शाहूपुरी परिसरातील नागरिकांतून होत आहे.

إرسال تعليق