सातारा प्रतिनिधी : चांगदेव काळेल
:भर शहरात आणि गजबजलेल्या परिसरातून अनियंत्रित वेगाने जाणाऱ्या दुचाकी आणि गाडीच्या हौदयाबाहेर आलेले लोखंडी साहित्य यावर कोणतीही कारवाई न करता वाहतूक शाखेकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे अपघाताची तसेच जीवित व वित्तहानी शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा शहरातील रस्ते मुळातच अरुंद असल्याने सातत्याने येथे वाहतुकीची कोंडी होत असते. त्यातच सायलेन्सरमध्ये बिघाड करून कर्णकरकश्य आवाजात आणि अनियंत्रित वेगात गाड्या चालवणारे दुचाकीस्वार मोठ्या प्रमाणावर ध्वनीप्रदूषण करत असतात. मात्र वाहतूक शाखा त्यांच्याकडे सर्रास डोळेझाक करते. याशिवाय बांधकामासाठीचे लोखंडी साहित्य घेऊन जाणारे टेम्पो, ट्रक, कंटेनर यांच्याकडूनही वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली होत असते. कोणतीही दक्षता न घेता टेम्पोमध्ये भरलेले लोखंडी सळ्या, चॅनेल, गरडल आदी साहित्य वाहून नेणारे वाहन चालकही असुरक्षितरित्या वाहने चालवताना दिसतात. मंडप चालकही मंडपाचे साहित्य अशाच पद्धतीने रिक्षाटेम्पो व अन्य वाहनातून नेत असतात.
फ्लेक्ससाठीच्या मोठ्या फ्रेमही अशाच पद्धतीने वाहतूकसुरक्षेची कोणतीही खबरदारी न घेता नेताना दिसतात. वास्तविक असुरक्षितरित्या साहित्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर नियंत्रण ठेवणे व कारवाई करणे ही जबाबदारी पोलिसांच्या वाहतूक शाखेची आहे. मात्र संबंधित शाखेचे कर्मचारी आणि अधिकारी अशा अपघातजन्य परिस्थितीकडे सर्रास दुर्लक्ष करताना दिसतात. वाहतूक शाखेच्या कार्यालयासमोरूनच बऱ्याचदा असे साहित्य घेऊन जाणारी वाहने जात असतात. मात्र त्याचे काही सोयरसुतक संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना नसते. एखाद्या सर्वसामान्य दुचाकीस्वाराकडे वाहन परवाना नसेल, वैद्यकीय किंवा शालेय अत्यावश्यक कारणासाठी ट्रिपल सीट प्रवास होत असेल, सर्वसामान्यांची पियूसी संपली असेल, एखाद्या युवती, महिला किंवा ज्येष्ठ नागरिकाकडून काही नियमभंग झाला असेल तर, अशा प्रसंगी राणा भीमदेवी थाटामध्ये कारवाईचा बडगा उचलण्याचा पराक्रम वाहतूक शाखेचे कर्मचारी करत असतात. मात्र अपघात आणि जीवित हानीस कारणीभूत ठरतील अशा अवजड आणि चुकीच्या पद्धतीने लोखंडी साहित्य भरलेल्या वाहनांना अडवण्याचे धारिष्ट वाहतूक शाखेच्या जबाबदार कर्मचाऱ्यांकडे दिसून येत नाही. "ते बिचारे" नो पार्किंगमध्ये लावलेली एखाद्या विद्यार्थिनीची किंवा जेष्ठ नागरिकाची दुचाकी उचलण्यात मश्गुल असतात. क्रेनने गाडी उचलल्यानंतर बाहेरच्या बाहेर प्रकरण मिटवण्यात आणि पावतीशिवाय गाडी सोडण्यात त्यांना रस असतो. एखाद्या गुन्हेगाराकडून वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांना देणगीदाखल बूट मिळण्यात आणि संबंधित संघटनेने शू मार्ट मालकाचे पैसे देण्यात ढीलाई दाखवल्याने, चेक बाऊन्स झाल्याने उद्भवलेल्या परिस्थितीत संबंधित दुकानदाराची मनधरणी करण्यात आणि वरिष्ठांची बोलणी खाण्यात वेळ घालवत असतात. त्यामुळे सातारकर जनतेनेच आता दक्ष राहिला हवे आणि जर अशी एखादी ओव्हरलोड गाडी जाताना दिसली तर अपघात होऊ नये म्हणून स्वतःच दक्षता घ्यायला हवी, शक्य झाले तर अशा गाड्यांचे फोटो व्हिडिओ काढून ते जिल्हा पोलीस प्रमुखांना पाठवायला हवेत. कारण वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी चमकोगिरी करण्यात व्यस्त आहेत. नियुक्त कर्तव्य बजावण्यात त्यांना "यादवी"चा "अभिजात" फील येतो, असा सर्वसामान्य वाहन चालकांचा आणि जनतेचाही अनुभव आहे. या प्रश्नाचा जिल्हा पोलीस प्रमुखांनी लक्ष द्यावे,अशी मागणी जनतेतून होत आहे.
Post a Comment