सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्यूज
पुणे (लोणावळा) : मावळ तालुक्यात असणाऱ्या लोहगड किल्ल्याच्या पायथ्याला फिरण्यासाठी आलेल्या पेण येथील खाजगी क्लासच्या विद्यार्थ्यांच्या बसचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही बस थेट जवळ असलेल्या ४० फूट खोल दरीत जाऊन कोसळली. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
मावळ तालुक्यातील लोहगड हा पर्यटनासाठी अत्यंत महत्वाचा मानला जाणारा गड आहे. या ठिकाणी पेण येथून ८० जण बसमधून फिरण्यासाठी आले होते. त्यात ७२ विद्यार्थी, चार शिक्षक, आणि इतर कर्मचारी होते. लोहगड किल्ल्याजवळ असलेल्या दुधिवरे खिंडीत ही बस कोसळली. जखमी असलेल्या तिघांना लोणावळा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून देण्यात आली आहे. लोणावळा आणि सोमाटणे येथील रुग्णालयात जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
जखमींना लोणावळा, सोमाटणे येथील खासगी रुग्णालय व काले कॉलनी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींना लोणावळा ग्रामीण पोलीस व शिवदुर्ग मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी बाहेर काढले. यांच्या सहकार्याने सर्व पर्यटक सुखरूप आहेत. या प्रकरणी अधिक तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत.

Post a Comment