शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीतील केबल्स तसेच अनाधिकृत जाहिरात फलक व बॅनर्स स्वखर्चाने काढून घेण्याचे आवाहन_


 सुनिल थोरात

महाराष्ट्र पोलीस न्यूज

पुणे : पुणे सातारा राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८,  पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ आणि पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्र ६० च्या हद्दीतील केबल्स, वायर्स आणि अनाधिकृत जाहिरात फलक काढून घेण्याचे आवाहन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्यावतीने करण्यात आले आहे.



         भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकार क्षेत्रामधील सातारा राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ वरील नवीन कात्रज बोगदा ते देहूरोड दरम्यान, पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ वरील कवडीपाट ते पाटस दरम्यान आणि पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्र ६० च्या हद्दीतील नाशिक फाटा ते खेड दरम्यान राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीमध्ये विविध ठिकाणी उड्डाणपुलाच्या संरक्षण भिंतीवर अनाधिकृतपणे वेगवेगळ्या प्रकारच्या केबल्स, वायर्स टाकलेल्या आहेत.



           पथ दिव्यांच्या खांबांदरम्यान विविध प्रकारच्या केबल्स, वायर्स लटकलेल्या आहेत. मेडीयन, लाईट ब्रेकर्स व महामार्गाच्या हद्दीत अनाधिकृत जाहिरात फलक, बॅनर्स व इतर अतिक्रमण झालेले दिसून आले आहे. त्यामुळे महामार्गाचे विद्रुपीकरण होत आहे. सदर केबल्स, वायर्स तसेच अनाधिकृत जाहिरात फलक व बॅनर्स मुळे दुचाकीस्वारांचे अपघात होत आहेत. या प्रकारच्या केबल्स, वायर्स तसेच अनाधिकृत जाहिरात फलक व बॅनर्स लावण्यास एनएचएआयकडून कुठलीही परवानगी देण्यात आलेली नाही. जिल्हा प्रशासन, स्थानिक प्रशासन व नागरिकांनी कात्रज बोगदा ते देहूरोड दरम्यान आपल्या केबल्स, वायर्स तसेच अनाधिकृत जाहिरात फलक व बॅनर्स स्वखर्चाने ७ दिवसात काढून घ्यावेत. मुदतीनंतर प्राधिकरणाच्यावतीने काढताना नुकसान झाल्यास प्राधिकरण जबाबदार राहणार नाही.  हे अतिक्रमण दि कन्ट्रोल ऑफ नॅशनल हायवेज (लँड अॅन्ड ट्राफिक) अॅक्ट २००२ अन्वये निष्कासित करण्यात येतील व त्याचा खर्च व दंड संबंधितांकडून वसूल करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे पुणे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी दिली आहे

Post a Comment

Previous Post Next Post