शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

जेऊर च्या नागरिकांवर रेल्वे प्रशासनाचा अन्याय : सोई सुविधा पासून नागरिक वंचित


 धनंजय काळे 

महाराष्ट्र पोलीस न्यूज


सोलापूर (करमाळा) : सोलापूर रेल्वे विभागातील कुर्डुवाडी नंतर सगळ्यात जास्त उत्पन्न देणारे आणि दळणवळण साठी सोयीस्कर असलेले जेऊर रेल्वे स्टेशन असून आता जेऊर परिसरातील नागरीकांसाठी अडचणीचे झालेले आहे येथील रेल्वे स्टेशन वरील गाड्यांना थांबा मिळत नाही तर रेल्वे बोर्ड ही जेऊरकरांच्या अडचणी समजून घेत नाहीत. 

            जेऊर हे पंधरा हजार लोकसंख्येचे गाव असून जेऊर रेल्वे स्टेशनला करमाळा, इंदापूर, जामखेड, कर्जत, परांडा, भूम असे सहा तालुके जोडलेली असून या तालुक्यांसाठी जेऊर हे एकमेव रेल्वे स्टेशन आहे, परंतु मोजक्याच गाड्या जेऊर रेल्वे स्टेशनवर थांबत असल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. रेल्वे स्टेशनवर फक्त हैद्राबाद एक्सप्रेस, सिध्देश्वर एक्सप्रेस आणि चेन्नई मेल, इंद्रायणी एक्सप्रेस ह्या चार एक्सप्रेस गाड्या तर पुणे-सोलापूर डेमो एवढ्याच गाड्यांचा थांबा आहे. 

                रेल्वे स्टेशनवर आणखी गाड्या थांबण्यासाठी विनंती केली असता आता गाड्या थांबाव्यात यासाठी निवेदन देण्यात यावे. अशी अट रेल्वे कडून देण्यात येत आहे, आजपर्यंत कित्येक अशी निवेदने दिली परंतु रेल्वे थांबत नाही. 

               याच पार्श्वभूमीवर २१ फेब्रुवारीला जेऊर येथे मोठ्या प्रमाणात मोर्चा काढण्यात आला होता, तरीही रेल्वे प्रशासन उदासीन असून जनतेच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे.

              सध्या जेऊर वरून पुण्याला जायचे झाले तर सकाळी ६:१० वाजता हैद्राबाद-मुंबई एक्सप्रेस आहे त्यानंतर नऊ तासांनी दुपारी ३:३० वाजता सोलापूर-पुणे इंद्रायणी एक्सप्रेस आहे तर तिथून नऊ तासांनी रात्री १:३० ला चेन्नई-मुंबई एक्सप्रेस गाडी आहे म्हणजेच जवळजवळ नऊ तासांचे अंतर तीन गाड्यांमध्ये आहे.

           या व्यतिरिक्त एक ही रेल्वे गाडीचा थांबा जेऊर रेल्वे स्टेशनवर नसल्यामुळे येथील प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे जेऊरकरांच्या समस्या आणखीनच वाढलेल्या आहेत. याला पर्याय म्हणून हुतात्मा आणि दुपारची उद्यान एक्सप्रेसला जेऊर रेल्वे स्टेशनवर थांबा देण्याची मागणी होत आहे. ‘डिजीटल’ इंडिया या संकल्पनेत आजही निवेदनाद्वारे रेल्वे गाड्या थांबाव्यात यासाठी मागणी करणे म्हणजे खूप लाजीरवाणी गोष्ट आहे, रेल्वे बोर्डाने सर्वे करून रेल्वे स्टेशन, गाव, लोकसंख्या, उत्पन्न ठरवून इतर रेल्वे गाड्यांना थांबा देऊन नागरिकांची गैरसोय टाळली पाहिजे. 

          निवेदनाद्वारे गाड्या थांबण्यापेक्षा आहे ते रेल्वे स्टेशन बंद करावे अशी अतिरिक्त मागणी होत आहे.


        जेऊर मधून पुण्याला जाण्यासाठी सकाळी ६:१५ वाजता हैद्राबाद-मुंबई एक्सप्रेस आहे. १ फेब्रुवारी पासून सदरील एक्सप्रेस सुपरफास्ट करण्यात आली. गाडीचे स्लीपर डब्बे दहा वरून दोन करण्यात आले. आणि एसी डब्बे वाढविण्यात आले. दरम्यान जेऊर परिसरातील 28 गावातील शेकडो नागरिक दररोज पुण्याला ये-जा करतात. हैद्राबाद-मुंबई एक्सप्रेस मधील स्लीपर डब्बे कमी झाल्यामुळे गर्दी वाढलेली असून जेऊरकरांचा रेल्वे प्रवास जीवघेणा झालेला आहे.

            पहिल्यापासून जेऊरकरांवर अन्यायच झालेला आहे. रेल्वे गाड्या थांबा पासून ते रेल्वे प्लॕट फाॕर्म ते रेल्वे गेट-भुयारी मार्ग आणि रेल्वे ब्रिज (आपल्या भाषेत ‘दादरा’ होय). प्रथमता रेल्वे ब्रिज हा पुर्व-पश्चिम भागातील नागरिकांसाठी येणाऱ्या-जाणाऱ्यांसाठी करण्यात आले होते. परंतु आता रेल्वे बोर्डाने तो ब्रिज फक्त रेल्वे प्लॕट फाॕर्म पुरताच मर्यादित ठेवण्याचा घेतलेल्या निर्णयामुळे आता मात्र कहरच झालेला आहे.

              २०१२ ला कोणत्याही प्रकारचे कारण न देता अन् कोणत्याही प्रकाराची पर्यायी सोय न करता जेऊर रेल्वे गेट कायमस्वरूपी बंद करण्यात आले. जेऊरचे पुर्व-पश्चिम असे दोन भाग झाले, तब्बल सात वर्षांनी म्हणजेच २०१९ ला भुयारी मार्ग मिळाला, त्या अगोदर जेऊर रेल्वे स्टेशनवर हैद्राबाद एक्सप्रेस चा थांबा मिळावा यासाठी गावकरी मंडळींनी प्रयत्न केले तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले, आता तर दुहेरीकरण आणि विद्युतीकरणामुळे रेल्वे गाड्यांमध्ये प्रचंड वेग आला आहे, परंतु रेल्वे गाड्यांचे जेऊरचे टाईमटेबल बिघडलेले आहे, कमी गाड्या थांबत असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post