(संपादक) सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे (हडपसर) : मराठा समाजाच्या आरक्षणसाठी लढा देणारे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी हडपसर मध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आला.
ससाणेनगर येथून सुरु केलेल्या मोर्चाचा समारोप हडपसर पीएमपी स्थानक येथे करण्यात आला. हजारो समाजबांधव अतिशय शिस्तीत या मोर्चात सहभागी झाले होते.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी दुसऱ्या टप्प्यातील उपोषण आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी हडपसर मध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला. मोर्चात महिला, शालेय विद्यार्थिनी व लहान मुले मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. ससाणेनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पायी मोर्चा सुरु करण्यात आला. मोर्चामध्ये सर्वात पुढे मुली, मागे महिला, मग नागरिक व राजकीय पदाधिकारी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सहभागी झाले होते.
हडपसर गाव, रवीदर्शन चौकातून हडपसर पोलीस स्टेशनजवळ पीएमपी स्थानक मध्ये सांगता सभेने मोर्चाचा समारोप झाला. लहान मुलींच्या हस्ते हडपसरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके यांना निवेदन देण्यात आले. संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या आरक्षणसाठी प्राणाची बाजी लावून उपोषण आंदोलन करत आहेत, राज्यातुन सकल मराठा समाजाचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे, राज्य सरकार गांभीर्याने लक्ष देत नाही, जर जरांगे पाटील यांच्या जीविताला धोका झाला तर मंत्री, खासदार आमदार यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, समाज आक्रमक होऊन रस्त्यावर उतरून चक्काजाम करणार असा इशारा आयोजक संदीप लहाने पाटील यांनी दिला.
मराठा समाजाच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे पोहोचविले जाईल अशी माहिती हडपसरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके यांनी दिली.
एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे, घोषणांनी मराठा समाजाने परिसर दणाणून सोडला.

Post a Comment