सुनिल थोरात (संपादक)
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे (हडपसर) : मराठा समाजाला आरक्षणासाठी आंतरवाली सराटी (जि. जालना) येथे प्रा. मनोज जरांगे पाटील यांनी अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे. राज्यभर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलनाचा वणवा पेटला असताना सकल मराठा समाजाच्या वतीने हडपसर येथे उड्डाण पुलाखाली कुपोषण आंदोलन करण्यात आले. (गुरुवार, दि. २ नोव्हेंबर) सायंकाळी सरकारच्या अस्थि गोळा करून सावडणे आणि त्यानंतर कावळा शिवेपर्यंत कोणीही हलणार नाही, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे.
हडपसर उड्डाण पुलाखाली बाळासाहेब भिसे, हेमंत ढमढेरे, संदीप लहाने पाटील, अनिल मोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन तीव्र करण्यात आले. यावेळी हडपसर परिसरासह शहरातील सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी आंदोलनात सहभागी होत मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशीच भूमिका घेतली.
माजी महापौर प्रशांत जगताप, डॉ. शंतनू जगदाळे, विजय देशमुख, वंदना मोडक, रुपेश तुपे, अजय न्हावले, प्रशांत पवार, सुमित घुले, सागरराजे भोसले, बाळासाहेब घुले, शंकर घुले, बाबासाहेब शिंगोटे, हनुमंत मोटे, विजय भाडळे, रवी तुपे, गुलाब सय्यद, जयश्री चव्हाण, सविता भिसे, यांनीही आंदोलनामध्ये सहभाग नोंदविला.
संदीप लहाने पाटील म्हणाले की, मराठा समाजाने आतापर्यंत शांततामय मार्गाने आंदोलन केले आहे. यापुढेही शांततेत आंदोलन करण्याची भूमिका आहे, कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची प्रत्येकाने दक्षता घ्यायची आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
बाळासाहेब भिसे म्हणाले की, सर्व समाजातून मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी भूमिका असूनही राज्यकर्त्यांकडून त्याला प्रतिसाद दिला जात नाही. त्याच्या निषेधार्थ मुर्दाड सरकारला सावडणे आणि कावळा शिवेपर्यंत कोणीही हलणार नाही, असा पवित्रा घेतल्याचे त्यांनी सांगितले.
आरक्षण दिले नाही तर आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा हेमंत ढमढेरे यांनी दिला.

Post a Comment