शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

नागठाणे ग्रामस्थांनी रात्रीत मंदिर बांधून निर्माण केला अनोखा आदर्श


 चांगदेव काळेल (प्रतिनिधी)

महाराष्ट्र पोलीस न्यूज


 सातारा :  सूर्यास्तानंतर बांधकामास प्रारंभ करून सूर्योदयापूर्वी मंदिर पूर्ण झाल्याच्या कथा आपण बऱ्याचदा ऐकतो, मात्र नागठाणे ग्रामस्थांनी पांडवकालीन रवळेश्वर मंदिराचे एका रात्रीमध्ये बांधकाम पूर्ण करून पुराणकथेला उजाळा देत असतानाच अनोखा आदर्श निर्माण केला आहे. 

              याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा तालुक्यातील नागठाणे गावच्या पंचक्रोशीत पाडळी, सोनापूर व जांभळेवाडी या गावातील रहिवाशांची परमश्रद्धा असलेले रवळेश्वराचे एक पुरातन मंदिर नागठाणे- सोनापुर रस्त्यावर होते. हे पुरातन मंदिर पांडवांनी एका रात्रीत बांधले होते असे सांगितले जाते.

            काळाच्या ओघात जीर्ण झालेल्या या मंदिराची पुनर्स्थापना करणे गरजेचे होते. जांभेवाडीतील हे स्थान म्हणजे शंभू महादेवाचे स्वयंभू अवतार क्षेत्र असल्याची भाविक भक्तांची मोठी श्रद्धा आहे. मात्र पांडवांनी पुराणकाळात जसे एका रात्रीत मंदिर बांधले तसेच हे मंदिर बांधावे अशी संकल्पना श्रद्धाळू भाविकांनी व्यक्त केली. त्यानुसार बुधवार, दि. २८ डिसेंबरच्या रात्री सात वाजता चार पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली विधिवत पूजा करून मंदिरास च्या बांधकामासाठी श्रमदानात सुरुवात झाली नागठाणे, पाडळी, सोनापूर, जांभळेवाडी येथील ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे हे मंदिर बांधण्यासाठी श्रमदान करण्यास सुरुवात केली व गुरुवारचा दिवस उगवण्यापूर्वी मंदिराच्या बांधकामास मोठ्या श्रद्धेने पूर्ण केले. 

               या कामासाठी पंचक्रोशीतील आबालवृद्धांनी मोठ्या श्रद्धेने योगदान दिले व पांडवकालीन रवळेश्वराचे मंदिर नव्या रूपात साकार झाले केवळ पुराणकथेतच वाचलेले एका रात्रीत मंदिर निर्माण कार्याचे किस्से प्रत्यक्षात आणण्यासाठी योगदान दिलेल्या साक्षी उद्योग समूहाचे शिल्पकार नितीनतात्या साळुंखे व अन्य ग्रामस्थांचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे. परिसरातील कोणत्याही सामाजिक धार्मिक शैक्षणिक उपक्रमासाठी नितीन साळुंखे यांचे नेहमीच तन- मन-धनाने सहकार्य असते. त्याच धर्तीवर ते त्यांच्या मित्रमंडळींनाही सामाजिक कार्यासाठी सातत्याने प्रेरित करत असतात. रवळेश्वर मंदिराच्या एका रात्री मधील उभारणीसाठी ही त्यांनी बहुमोल अशी भूमिका बजावली असून पांडवांनी एका रात्रीत मंदिर उभारले, या पुराण कथेच्या धरतीवर नागठाणेकरांनीही एका रात्रीत मंदिर साकारले ही बाब संपूर्ण जिल्ह्यात कौतुकाची व चर्चेचा विषय झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post