चांगदेव काळेल (प्रतिनिधी)
महाराष्ट्र पोलीस न्यूज
सातारा : (दि.३१) सैदापूर येथील बुद्धविहाराच्या दरवाज्याचे कुलूप दगड मारून तोडण्यास भाग पाडून सरपंच, त्यांचे पती व काही व्यक्तींनी पादत्राणांसह आतमध्ये प्रवेश केला. तसेच बौद्ध समाजातील नागरिकांमध्ये कलह निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
या प्रकरणी ३ फेब्रुवारीपूर्वी संबंधितांवर गुन्हा दाखल न झाल्यास सोमवारी (दि. ५ फेब्रुवारी रोजी) तालुका पोलीस ठाण्यावर आक्रोश महामोर्चा काढण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते मिलिंद वामन कांबळे यांनी दिला आहे.
या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांसह समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांना दिलेल्या लेखी निवेदनात मिलिंद कांबळे यांनी म्हटले आहे की, सैदापूरच्या बुद्ध विहारात काही व्यसनाधीन व्यक्ती मद्यपान करणे, गांजा ओढणे, बीडी सिगारेट फुंकणे तसेच पत्ते खेळणे आधी चुकीच्या बाबी करत असल्याने सामाजिक वस्तूचे पावित्र्य राखण्याच्या हेतूने बौद्ध समाजबांधवांनी चर्चा करून या इमारतीला समाजातर्फे स्वतंत्र कुलूप लावले.
सरपंच शीतल प्रवीण पवार, त्यांचे पती व काही समाजकंटकांनी श्रीकांत सुधाकर कांबळे यांना आमिष दाखवून कांबळे हे दारूच्या नशेमध्ये असताना बुद्ध विहाराच्या दरवाजावर व कुलपावर दगड घालण्यास त्यांना प्रवृत्त केले.
हा प्रकार गावातील काही महिलांनी मोबाईल रेकॉर्ड केला आहे. वास्तविक बौद्ध समाजाच्या अनुसरणा नुसार केवळ प्रार्थना व स्वच्छतेसाठीच बुद्धविहार वापरले जाते. तेथे अन्य कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम घेतले जात नाहीत. मात्र सरपंच व काही इतर व्यक्तींनी बुद्ध विहारात ग्रामसभा घेण्याचे ठरवले होते. त्यास समाजाने विरोध केला, तसेच केवळ कागदोपत्री होत असलेल्या ग्रामसभांच्या प्रोसिडिंगवर सह्या करण्यासाठी नकार दिला. असता सरपंच, त्यांचे पती व त्यांच्या काही समर्थकांनी बुद्ध विहाराची विटंबना केली असे मिलिंद कांबळे यांनी या निवेदनात म्हटले आहे.
तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी या प्रकरणाचा गुन्हा नोंद करू, असे आश्वासन दिल्याने नियोजित आत्मदहन आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र याबाबत तालुका पोलीस ठाण्यात गेल्यावर गुन्हा नोंद करणे दूरच उलट "तहसीलदारांच्या कार्यालयात हेलपाटे घालायला लावतो. सहा महिन्यांचा बॉण्ड लिहून घेतो," अशी भाषा पोलीस अधिकाऱ्यांनी वापरली.
या प्रकाराने समाजबांधवांच्या भावना दुखावल्या असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याच्या निर्णयावर बौद्ध समाजबांधव ठाम आहेत. ३ फेब्रुवारीपर्यंत गुन्हा दाखल न झाल्यास सोमवार दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सातारा तालुका पोलीस ठाण्यावर बौद्ध समाज बांधवांतर्फे आक्रोश महामोर्चा काढण्यात येणार आहे.
..बीट अंमलदार माने यांचा उद्धटपणा..
दोषींवर गुन्हा दाखल व्हावा यासाठी पोलीस स्टेशनला गेलेल्या ग्रामस्थांशी सैदापूर बीटचे हवालदार माने हे उद्धटपणे भाषा वापरत असल्याचा कांबळे यांचा आरोप आहे.
"तुम्ही कुणाकडेही जावा. गुन्हा नोंद होणार नाही," अशी अरेरावीची भाषा माने यांनी वापरली असून या प्रकारामुळे आपल्या जीवितास धोका असल्याचा आरोपही मिलिंद कांबळे यांनी या निवेदनात केला आहे.
या सर्व प्रकरणावर वरिष्ठ पोलीस अधिकारी/यंत्रणा कशा प्रकारे कारवाई करणार हे येणार काळच ठरवणार ..

Post a Comment