जयंती दिनाचा साधला मुहूर्त, दुर्मिळ कागदपत्रांचे डिजीटलायजेशन..
(प्रतिनिधी)
पुणे : यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या यशवंतराव चव्हाण साहेबांवरील वेबसाईटचे अनावरण चव्हाण सेंटरचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
या वेबसाईटवर यशवंतराव चव्हाण यांचा संपूर्ण जीवनपट आहे तसेच त्यांनी लिहिलेली पुस्तके, त्यांच्यावर लिहिलेली पुस्तके, त्यांनी केलेली विविध भाषणे, विधीमंडळातील भाषणे, संसदेतील भाषणे त्याचबरोबर त्यांची दुर्मिळ छायाचित्रे आणि मुलाखती देखील उपलब्ध आहेत. त्याचबरोबर चव्हाण साहेबांनी जपलेली एकूण १.७० लाख मूळ कागदपत्रे तसेच चव्हाण साहेबांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीत घेतलेले निर्णय महाराष्ट्र शासनाच्या ‘लोकराज्य’ या मासिकात प्रसिद्ध झाले होते. ते निर्णय देखील डिजिटल स्वरुपात वेबसाईटवर लवकरच उपलब्ध होणार आहेत. एकूणच चव्हाण साहेबांचे कार्य जाणून घेण्यासाठी सामान्य नागरिकांसह, अभ्यासक, संशोधक, विद्यार्थी यांना ही वेबसाईट महत्वपूर्ण भूमिका बजावेल, अशी माहिती सतिश पवार यांनी दिली. याप्रसंगी जागतिक आरोग्य संघटनेच्या माजी प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन, चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे, जेष्ठ मार्गदर्शक डॉ.अनिल काकोडकर, डॉ.रघुनाथ माशेलकर, डॉ.नरेंद्र जाधव, अरुणभाई गुजराथी, हेमंत टकले, विवेक सावंत, अजित निंबाळकर, बी. के.अगरवाल, अदिती नलावडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार २०२३ च्या पुरस्कार सोहळ्यात हा सोहळा पार पडला.
स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशाला तसेच महाराष्ट्राला केवळ कायदा आणि सुव्यवस्था स्वरूपाच्या प्रशासनाची गरज नसून, विकासभिमुख व लोकाभिमुख प्रशासन अंमलात आणणे गरजेचे आहे. तेव्हाच परिपूर्ण प्रशासकीय व्यवस्था निर्माण होईल, हे ओळखणाऱ्या द्रष्ट्या व्यक्तींमध्ये यशवंतराव चव्हाण साहेब अग्रगण्य होते. हेच यशवंतरावांचे द्रष्टेपण होते. राजकीय काळातील निर्णय, विधिमंडळातील व संसदेतील भाषणे तिन्ही भाषेत ऑडीओ स्वरुपात वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
तसेच स्वत: चव्हाण साहेबांनी लिहिलेली पुस्तके तसेच त्यांच्या आयुष्यावर आधारित विविध लेखकांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी तिन्ही भाषेत लिहिलेली पुस्तके, संपादित पुस्तके ऑनलाईन स्वरुपात उपलब्ध आहेत. ही सगळी संपदा मोफत स्वरुपात वेबसाईटवर उपलब्ध आहे.
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष न्या. पी. बी. सावंत, मुंबई हायकोर्टाचे निवृत्त न्यायाधीश न्या. नरेंद्र चपळगावकर तसेच प्रा. डॉ. जनार्दन वाघमारे अशा प्रतिष्ठित व्यक्तींनी यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या विषयी मांडलेली मते तसेच चव्हाण साहेबांची दुर्मिळ छायाचित्रे या वेबसाईटवर पाहायला मिळतील.
महाराष्ट्र निर्मिती आणि वाटचाल यामध्ये यशवंतराव चव्हाण साहेब यांचे असलेले योगदान तसेच त्यांनी स्वत: लिहिलेली साहित्य संपदा आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारी विविध भाषेतील अनेक पुस्तके या यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय ग्रंथालयात उपलब्ध आहेत. या ग्रंथालयाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अशी माहिती ग्रंथपाल डॉ.अनिल पाझारे यांनी दिली.
यशवंतराव चव्हाण साहेब यांचा जन्म, राजकीय कारकीर्द आणि संपूर्ण जीवनपट आजही प्रेरणादायी आहे. तसेच लोकराज्य या शासकीय मासिक मंडळाने प्रकाशित केलेला ‘विशेषांक’ही उपलब्ध आहे. त्यामुळे वेबसाईटला भेट देण्याचे आवाहन, चव्हाण सेंटर तर्फे करण्यात आले आहे.
खासदार सुप्रिया सुळे म्हणतात आपण चव्हाण साहेबांची एक नवीन वेबसाईट https://yashwantraochavan.in लाँच करत आहोत त्यामुळे कोणाला चव्हाण साहेबांची संपूर्ण माहिती हवी असेल तेव्हा कोणीही व्यक्ती या वेबसाईटच्या आधारे माहिती मिळवू शकतो. चव्हाण साहेबांचे साहित्य, काम, भाषणे, दुर्मिळ कागदपत्रे त्यांची सगळी माहिती ही वेबसाईटवर उपलब्ध असणार आहे. ती माहीती आज मराठी भाषेत आहे. पण आगामी काळात ती हिंदी आणि इंग्रजीमध्ये देखील उपलब्ध करुन दिली जाईल. असे ही त्या पुढे म्हणाल्या...

Post a Comment