संकेत बागरेचा नेर
धुळे जिल्हा प्रतिनिधी
धुळे, ता. २३ : नेर (ता. धुळे) येथील नूरनगर शिवारातील तीन शेतकऱ्यांच्या खळ्यांना अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक आग लावली. यात तिन्ही शेतकऱ्यांचे खळ्यातील चाऱ्यासह धान्य, शेती अवजारे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. सुदैवाने आग लागल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी धाव घेत खळ्यातील जनावरे सोडली. यामुळे जीवित हानी टळली असली, तरी शेतकऱ्यांच्या शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे.
या आगीची त्वरित चौकशी करावी, यातील दोषीवर कारवाई करावी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना झालेल्या पंचनाम्यांनुसार तातडीने भरपाई द्यावी, अशी सूचना धुळे ग्रामीण मतदारसंघाचे आमदार राघवेंद्र (रामदादा) भदाणे यांनी महसूल विभागाला केली.
नेर येथील नूरनगर शिवारात पंडित जगन्नाथ देवरे, प्रवीण भीमराव पाटील व अशोक तानकू भोई यांचे खळे असून, आज दुपारी तीनच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक खळ्यातील चारा व शेतमालाला आग लावली. खळ्यांना आग लागल्याचे निदर्शनास येताच नेरचे माजी सरपंच तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव खलाणे, सामाजिक कार्यकर्ते दीपक शेठ खलाणे, वसंत बोरसे, मुरलीधर खलाणे, पोलिसपाटील विजय देशमुख यांच्यासह ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत खळ्यांतील जनावरे सोडली.
या आगीत सुदैवाने जीवित हानी टळली असली, तरी तिन्ही शेतकऱ्यांनी खळ्यात साठविलेला चारा, धान्याची पोती व अन्य शेतमाल तसेच शेती अवजारे आगीत खाक झाली. यात त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. नेरचे माजी सरपंच शंकरराव खलाणे यांनी तातडीने घटनेची माहिती आमदार रामदादा भदाणे यांना दिली. आमदार भदाणे यांनी त्वरित तहसीलदार अरुण शेवाळे, धुळे तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक अभिषेक पाटील यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत नुकसानीचे पंचनामे करण्यासह संबंधित शेतकऱ्यांना तातडीने भरपाई मिळवून देण्याच्या सूचना दिली. तसेच जाणीवपूर्वक आग लावणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेत चौकशी करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची सूचनाही केली. यानंतर मंडलाधिकारी समाधान पाटील, तलाठी सोनवणे, कोतवाल नाना कोळी यांनी घटनास्थळी जात नुकसानीचे पंचनामे केले. तोपर्यंत ग्रामस्थांनी पाण्याचे टँकर मागवून आगीवर नियंत्रण मिळविले.
Post a Comment