धुळे शहरातील गल्ली क्रमांक पाचमध्ये असलेल्या हॉटेल युनिक इन ओयोमध्ये आज आझादनगर पोलिसांनी अचानक धाड टाकली.
या धाडीत हॉटेलमधून पोलिसांनी महाविद्यालयीन तरुण व तरुणींना ताब्यात घेतल्यामुळे धुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून धुळे शहरातील गल्ली क्रमांक पाचच्या हॉटेल युनिक इनमध्ये महाविद्यालयीन तरुण-तरुणी अनधिकृतपणे येत असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी पोलिसांना दिली होती. या ठिकाणी कारवाई व्हावी अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून या परिसराती रहिवासी करीत होते.
अखेर आज पोलिसांनी अचानक या हॉटेलमध्ये धाड टाकून कारवाई केली आहे. यात पोलिसांनी काही महाविद्यालयीन तरुण आणि तरुणींना ताब्यात घेतले आहे. तर हॉटेल मालकाची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या प्रकरणी हॉटेल व्यावसायिकावर काय कारवाई होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
गेल्याकाही दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने एका अल्पवयीन मुलीची ओयो येथे नेऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार करून एका तरुणाने बदनामी केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. दरम्यान या घटनेनंतर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आले असून, पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. शहरातील गल्ली क्रमांक पाच येथे, आज झालेल्या कारवाईनंतर पोलीस प्रशासनाकडून या महाविद्यालयीन तरुण-तरुणींच्या पालकांना बोलवण्यात येणार असून त्यांना समज दिली जाणार आहे. तसेच यात अल्पवयीन आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे.
दरम्यान, मार्च महिन्यात धुळ्यातील देवपूर परिसरातील स्वामी नारायण मंदिर रोडवरील एका कॅफेवर पोलिसांनी धाड टाकली होती. कॅफेच्या वरच्या मजल्यावर तरूण तरूणी अश्लील चाळे करत असल्याची माहिती देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे देवपूर पोलीस ठाण्याचे पथक कॅफेवर जावून धडकले. या कॅफेची झडती घेतली जात असताना तेथे आठ तरुण तरुणी आढळून आले होते. तर फेब्रुवारीत करवंद रस्त्यावरील रोज कॅफेवर शहर पोलीस ठाण्याच्या दामिनी पथकाने छापा टाकत अश्लील चाळे करणाऱ्या तरुण-तरुणींना ताब्यात घेतले होते.
महाराष्ट्र पोलीस 24 न्यूज
धुळे जिल्हा प्रतिनिधी संकेत बागरेचा नेर
Post a Comment