शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

विनोबांचा सर्वोदय विचार उमेद व प्रेरणा देणारा : कुमार केतकर

विनोबांचा सर्वोदय विचार उमेद व प्रेरणा देणारा : कुमार केतकर 
गागोदे येथील 'जय जगत भवन'चे उदघाटन
 रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड 
गागोदे येथील विनोबा जन्मस्थान प्रतिष्ठानच्या 'जय जगत भवन' या नवीन वास्तूचे व सभागृहाचे उदघाटन दिनांक १४ एप्रिल रोजी ज्येष्ठ पत्रकार, संपादक कुमार केतकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना कुमार केतकर यांनी विनोबा भावे यांच्या विचारांना आणि काही आठवणींना उजाळा दिला. सद्य राजकीय-सामाजिक स्थितीवर, विशेषतः मोठ्या प्रमाणात घडवून आणल्या गेलेल्या धार्मिक ध्रुवीकरणावर भाष्य करत असताना त्यांनी विनोबांचा सर्वोदय विचारच अंतिमतः भारतीय समाजाच्या उत्थानासाठी आधारभूत ठरेल असे सांगितले. या प्रसंगी व्यासपीठावर 'अनार्डे फाउंडेशन'चे देवाशीष चौधरी आणि 'एसबीआय फाउंडेशन'चे किरण घोरपडे उपस्थित होते. 'जय जगत भवन' ही वास्तू कुमार केतकर राज्यसभा सदस्य असताना त्यांनी दिलेल्या खासदार निधीतून बांधण्यात आली आहे.  

दोन दिवस चाललेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मुलाखतही घेण्यात आली. या मुलाखतीत त्यांनी सर्वोदय विचारांशी त्यांची नाळ कशी जुळली यावर मनमोकळेपणाने संवाद साधला. तसेच महाविद्यालयात असताना युवक काँग्रेसचे सदस्यत्व ते आता प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद या प्रवासाचे मर्मही उलगडून सांगितले. अध्यक्षपद स्वीकारल्यापासून पक्ष पुनर्बांधणीच्या प्रयत्नांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे असे ते म्हणाले. धार्मिक-जातीय विद्वेषाने पोखरल्या गेलेल्या आजच्या महाराष्ट्राला सावरण्यासाठी महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांच्या संस्था, संघटना आणि काँग्रेस यांनी समन्वयाने काम करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.

राज्यशास्त्राच्या अभ्यासक आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एजुकेशन अँड रीसर्च' मध्ये मानव्यविद्या आणि सामाजिक शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. चैत्रा रेडकर यांनी यावेळी 'धर्म, धार्मिकता आणि धर्मनिरपेक्षता' या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला. काँग्रेसच्या 'संगम' या प्रशिक्षण विभागाशी जोडलेले आशुतोष शिर्के यांनी 'युवकांशी रीकनेक्ट होताना' या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. विनोबा विचारांचे अभ्यासक हेमंत मोने यांनी १८ एप्रिल २०२५ पासून सुरू होणाऱ्या भूदान जयंतीच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर भूदान यात्रेच्या संदर्भात उपस्थितांशी संवाद साधला. ज्येष्ठ गांधीवादी, बेळगाव परिसरात पाणलोट विकास क्षेत्रात भरीव कार्य करणारे शिवाजी कागणीकर, सायकलवरून सर्वोदयी विचारांच्या प्रचार करत पुस्तकविक्री करणारे जीक्न इंगळे यांनी त्यांच्या कार्याबद्दल उपस्थितांना माहिती दिली. अर्थतज्ज्ञ आणि महाराष्ट्र नियोजन मंडळाचे माजी सदस्य एच. एम. देसरडा यांनी आजच्या पर्यावरणीय संकटाबद्दल गांधीविचारांच्या परिप्रेक्ष्यातून मांडणी केली. शिवाजी कागणीकर यांचा या कार्यक्रमात कुमार केतकर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.  

ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते व विनोबा जन्मस्थान प्रतिष्ठानचे विश्वस्त, गागोदे आश्रमाचे संचालक विजय दिवाण यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रतिष्ठानच्या अध्यक्ष नीला आपटे, सचिव उत्पल व. बा. आणि विश्वस्त ज्ञानप्रकाश मोदानी, श्रीराम जाधव, सरिता राजभर, माधव सहस्त्रबुद्धे कार्यक्रमाला उपस्थित होते. उत्पल व. बा. यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि हर्षवर्धन सपकाळ यांची मुलाखत घेतली.

Post a Comment

Previous Post Next Post