शिवाजी पवार
इंदापूर तालुका प्रतिनिधी
इंदापूर, ता. ३१ जुलै २०२५ :
भारतीय लोकशाही ही जगात सर्वश्रेष्ठ मानली जाते आणि तिची पायाभरणी लहानपणीपासून व्हावी या उद्देशाने इंदापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुल आणि मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही जागृती घडवून आणण्यासाठी एक अभिनव उपक्रम राबवला जात आहे.
ट्रस्टचे सचिव ॲड. समीर मखरे यांच्या संकल्पनेतून ही निवडणूक प्रक्रिया शालेय स्तरावर राबवण्यात येत असून ही संकल्पना आश्रमशाळांसाठी आदर्श ठरणारी आहे.
या उपक्रमांतर्गत शाळेतील ५ वी ते १२ वी इयत्तेतील विद्यार्थी मतदार म्हणून सहभाग घेणार असून ते मतपत्रिकेद्वारे मतदान करतील. हा उपक्रम शनिवार, दि. २ ऑगस्ट २०२५ रोजी पार पडणार असून मतमोजणी त्याच दिवशी दुपारीनंतर होणार आहे.
शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना निवडणूक, प्रचार, मतमोजणी याविषयीची माहिती व प्रत्यक्ष अनुभव मिळावा, तसेच त्यांच्यात लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण व्हावी यासाठी ही संकल्पना साकारली जात आहे. भविष्यात मतदान करताना कोणतीही अडचण भासू नये व मताचा योग्य वापर करता यावा, यासाठी ही शालेय निवडणूक मोलाची भूमिका बजावेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
या निवडणुकीसाठी विद्यार्थ्यांनी उमेदवारी अर्ज भरून ते सादर केले असून अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. निवडणूक चिन्हे वाटप झाल्यावर उमेदवारांचे पॅनल तयार करण्यात आले असून सध्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचाराची चुरस सुरू आहे. आपापल्या चिन्हांसाठी उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.
या निवडणुकीतून निवडून आलेल्या प्रतिनिधींमधून शालेय संयुक्त मंत्रिमंडळाची निवड केली जाणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांना केवळ लोकशाही मूल्यांची ओळखच नव्हे, तर नेतृत्वगुण, संघटनकौशल्य, जबाबदारी व मताधिकाराचे महत्त्वही समजेल.
ही संकल्पना भविष्यातील सजग नागरिक घडवण्यासाठी उपयुक्त ठरेल आणि लोकशाही बळकट करण्यासाठी मोठे योगदान देईल,” असे प्रतिपादन ॲड. समीर मखरे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
Post a Comment