संजय गायकवाड
सुधागड पाली रायगड उपसंपादक
सुधागड तालुक्यातील पाली पोलिसांनी रविवारी मोठी कारवाई करत मेढ्यांच्या झुंजीवरून सुरू असलेला अवैध सट्टा उधळून लावला. मौजे गोंदव गावातील टायगर गोट फार्म या ठिकाणी तब्बल शेकडो लोकांसमोर चालू असलेल्या या सट्टा-जुगार प्रकरणात पोलिसांनी छापा टाकून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केला असून अनेकांना अटक करण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पाली पोलिसांनी ही कारवाई केली. पोलीस उपनिरीक्षक प्रसाद मधुकर पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धाडीतून पोलिसांनी –झुंजीसाठी आणलेले ४ मेढे,रोख रक्कम १० लाख ३७ हजार रुपये,तब्बल १.२७ कोटींची किंमत असलेली वाहने, दुचाकी, चारचाकी व इतर साहित्य,मोबाईल फोन व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे,
अशा प्रकारे एकूण १.३७ कोटींपेक्षा अधिक किंमतीचा ऐवज जप्त केला आहे.
या प्रकरणी शेख मोहम्मद शोएब, मोहम्मद अमान खान, आर्यन जाधव, सरफराज शेख, शेख फराज, अनुज जगताप, अजरुद्दीन मंसी, समीर सय्यद आदींसह अनेकांना अटक झाली असून काही आरोपी फरार आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.
या प्रकरणी प्राण्यांना क्रूरतेने वागविण्याबाबतचा कायदा १९६० कलम ११(१)(M)(N) तसेच महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ कलम ४, ५, १२(ब)(क) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या धाडीत पाली पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक (PI) हेमलता शेरेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) दिपक भोई, PSI सरगर, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचा (LCB) स्टाफ यांनी सक्रिय सहभाग घेतला.
या धाडसी कारवाईनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ग्रामीण भागात मेढ्यांच्या झुंजीच्या नावाखाली चालणारा सट्टा किती मोठ्या प्रमाणावर वाढला आहे याचे हे ज्वलंत उदाहरण असल्याचे बोलले जात आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस.एम. निकम करीत आहेत.
Post a Comment