मुख्य संपादक
पुणे : गँगस्टर निलेश घायवळ याच्या कर्तृत्वाची आणखी एक बाजू समोर आली आहे. कोथरुड पोलिसांनी त्याच्याकडील दोन स्कॉर्पिओ गाड्या आणि दोन दुचाकी जप्त केल्या होत्या. मात्र, तपासादरम्यान या वाहनांपैकी एका दुचाकीवर शेतकऱ्याच्या स्कॉर्पिओ गाडीची नंबर प्लेट लावल्याचे उघडकीस आले आहे.
या प्रकरणी घायवळविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, यामुळे त्याच्या गैरप्रकारांमध्ये आणखी एक नवा अध्याय जोडला गेला आहे. या संदर्भात सागर भाऊसाहेब बंडगर (वय ३७, रा. भिगवण, ता. इंदापूर) यांनी कोथरुड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बंडगर यांच्याकडे महिंद्र कंपनीची स्कॉर्पिओ गाडी असून तिचा नोंदणी क्रमांक एमएच १२ एक्सडब्ल्यू ८९५५ असा आहे.
दरम्यान, कोथरुड पोलिसांनी निलेश घायवळ याच्याकडील सुझुकी अॅक्सेस ही दुचाकी कारवाईदरम्यान जप्त केली. तिची नंबर प्लेट तपासल्यानंतर तीही एमएच १२ एक्सडब्ल्यू ८९५५ असल्याचे आढळले. यानंतर पोलिसांनी तातडीने आरटीओकडे चौकशी केली. तपासात हा क्रमांक बंडगर यांच्या स्कॉर्पिओ गाडीचा असल्याचे स्पष्ट झाले.
याबाबत पोलिसांनी बंडगर यांना संपर्क करून चौकशीसाठी बोलावले. त्यांनी आपल्या स्कॉर्पिओची कागदपत्रे सादर करत हा क्रमांक त्यांच्या गाडीचा असल्याचे सिद्ध केले. त्यानंतर त्यांनी तक्रार नोंदवत सांगितले की, निलेश घायवळ याने आपल्या गाडीचा नंबर गैरवापरून त्याच्या दुचाकीवर लावला आहे. या प्रकारामुळे आपली आणि शासनाची फसवणूक झाली असल्याचे त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन चव्हाण करीत आहेत.
Post a Comment