शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

सहजपूर फाटा-नांदूर-खामगाव रस्ता खड्डेमय; नागरिकांच्या सुरक्षेसाठी उमेशभैय्या म्हेञे यांचा इशारा...


          धनंजय काळे
             प्रतिनिधी 
दौंड तालुका :
दौंड तालुक्यातील सहजपूर फाटा–फिल्टगार्ड कंपनी–नांदूर–खामगाव–गाडामोडी–खामगाव फाटा या मुख्य रस्त्यावरील गुडघाभर पडलेले खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी महाराष्ट्र लोक काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष उमेशभैय्या म्हेञे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी दोन वेळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदन दिल्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) व स्थानिक प्रशासनाकडून ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला.
१३ सप्टेंबर रोजी हडपसर येथे व २६ सप्टेंबर रोजी पुण्यातील नवीन सर्कीट हाऊस येथे झालेल्या जनसंवाद कार्यक्रमात म्हेञे यांनी थेट उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रस्त्याच्या दुरावस्थेचा मुद्दा मांडला होता. त्यांनी सांगितले की, सहजपूर-नांदूर परिसरात अनेक कंपन्या असल्याने या रस्त्यावरून अधिकारी, कामगार, शेतकरी, विद्यार्थी आणि रुग्ण यांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. मात्र रस्त्यावरच्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वारंवार अपघात घडत असून आतापर्यंत पाच ते सहा लोकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक नागरिक गंभीर जखमी होऊन काहीजण अपंग झाले आहेत.
म्हेञे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लक्ष वेधून सांगितले की, खड्ड्यांमुळे कंपन्या त्रस्त होऊन स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे स्थानिक रोजगार व आर्थिक घडामोडींवर परिणाम होत आहे. या निवेदनावर तातडीची कारवाई करण्यासाठी अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना खरडपट्टी काढली होती. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनाही लक्ष घालण्याचे आदेश दिले होते. परंतु, प्रत्यक्षात अद्यापही रस्त्यावरील काम सुरू झालेले नाही, असे म्हेञे यांनी स्पष्ट केले.
विशेष म्हणजे, शेतकरी पाईपलाईन टाकण्यासाठी रस्त्यावर आडव्या चारी काढतात आणि नंतर त्या व्यवस्थित बुजवत नाहीत. त्यामुळे छोट्या चारी मोठ्या खड्ड्यांत रूपांतरित होतात आणि अपघातांना कारणीभूत ठरतात. या समस्येवरही लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

म्हेञे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जर ४-५ दिवसांत रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाले नाही, तर सहजपूर ग्रामपंचायत कार्यालयासमोर किंवा तहसीलदार कार्यालय व PWD विभागाच्या बाहेर ते आमरण उपोषणास सुरुवात करतील.

दरम्यान, नागरिकांचा सवाल आहे की, "गेल्या कित्येक वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था कायम आहे. अपघातात जीव गेले, लोक अपंग झाले, तरीही प्रशासनाचे डोळे कधी उघडणार?" स्थानिक ग्रामस्थांनी PWD विभाग व ग्रामपंचायतीने तातडीने उपाययोजना करावी, अन्यथा आंदोलन टाळता येणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.

थोडक्यात:

सहजपूर-नांदूर-खामगाव रस्त्यावर गुडघाभर खड्डे.

आतापर्यंत ५-६ मृत्यू, अनेक जखमी व अपंगत्व.

दोन वेळा अजित पवारांकडे निवेदन, अधिकारी निष्क्रिय.

४-५ दिवसात काम सुरू न झाल्यास उमेशभैय्या म्हेञे यांचे आमरण उपोषण.

Post a Comment

Previous Post Next Post