शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

इंदापूर तालुका हा हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखला जातो.* कृषिमंत्री दत्तात्रय भरणे



 शिवाजी (आप्पा) पवार
      इंदापूर तालुका प्रतिनिधी 

       पुणे  : इंदापूर राधिक सेवा संस्था, इंदापूर यांच्या वतीने “हिंदू-मुस्लिम बंधु ऐक्याची दिवाळी २०२५” हा अनोखा सौहार्द मेळावा मोठ्या उत्साहात व मैत्रीभावाने संपन्न झाला. दरवर्षीप्रमाणे यंदाही इंदापूर शहरातील तसेच परिसरातील हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन दिवाळी साजरी करत, एकोपा, प्रेम आणि बंधुत्वाचा संदेश दिला.

हा कार्यक्रम मंगळवार, दिनांक २१ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता राधिक रेसिडन्सी लॉन्स, इंदापूर येथे पार पडला. कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री मा. दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे,  तसेच प्रताप आबा पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कृषिमंत्री मा. दत्तात्रय भरणे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “इंदापूर तालुका हा हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. हे ऐक्य अबाधित राहावे, टिकवावे. जर कोणी दोन्ही समाजांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याला बळी न पडण्याचे आव्हान मी करतो. हिंदू-मुस्लिम आपण सर्व भाऊ आहोत. काही लोक राजकीय स्वार्थापोटी ऐक्याला बाधा पोहोचवण्याचा प्रयत्न करतात, त्यापासून सावध राहावे.”

ते पुढे म्हणाले, “निवडणुका आल्या की काही लोक फक्त राजकीय स्वार्थासाठी एकत्र येतात, परंतु बंडू तात्या (अरविंद वाघ) त्याला अपवाद आहेत. त्यांनी ‘राधिका सेवा संस्था’च्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून हिंदू-मुस्लिम एकता टिकवण्याचा स्तुत्य उपक्रम राबवला आहे.”

भरणे यांनी पुढे स्पष्ट केले की, “इंदापूर तालुक्यातील मुस्लिम समाजाला आपण अधिक निधी देण्याचा प्रयत्न केला. आपण सर्वजण एका घरातील आहोत, त्यामुळे तुमच्या समस्या म्हणजे आमच्या समस्या. त्या सोडवण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत,” असेही त्यांनी सांगितले.

या वेळी आप्पासाहेब जगदाळे म्हणाले, “आपले बालपण देखील मुस्लिम बांधवांसोबत गेले आहे. त्या काळापासूनच आम्ही सर्वांनी एकोप्याने, प्रेमाने नाती जपली आहेत. राजकीय स्पर्धापोटी कोणीही काही ही अफवा उठवेल त्यावर विश्वास ठेवता कामा नये" असेही ते म्हणाले

मौलाना फारुक काजी तसेच दर्गा मस्जिदचे मौलाना अब्दुल करीम मुशाहिदी यांनी या कार्यक्रमाचे कौतुक करत सांगितले की, “देशातील सध्याच्या विषम परिस्थितीत अशा प्रकारचे धार्मिक सलोखा जपणारे कार्यक्रम होणे अत्यंत आवश्यक आहेत.तरच देशाची अखंडता राहील”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शरद झोळ यांनी प्रभावीपणे केले. या प्रसंगी सर्व मुस्लिम बांधवांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. शेवटी सर्व हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या व फराळाचा आनंद घेतला.

एकात्मता, बंधुता आणि सौहार्दाचा दीप उजळवत “राधिका सेवा संस्था”चा हा दिवाळी मेळावा इंदापूर तालुक्यातील ऐक्याचे तेजस्वी प्रतीक ठरला.

Post a Comment

Previous Post Next Post